करोनाचा सामना करणाऱ्या जगावर सध्या ओमायक्रॉनचंही संकट आलं आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. लसीकरणाच्या आधारे करोनावर पूर्पणणे नियंत्रण आणता येईल अशी अपेक्षा असतानाच करोनाचे नवे व्हेरियंट नवं आव्हान निर्माण करत आहेत. यामुळे अनेक देशांनी पूर्वतयारी करत निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.

ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी आधीच आपल्या मर्यादा ओलांडत काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात जागतिक रुग्णसंख्या ११ टक्क्यांनी वाढली असून अमेरिका आणि फ्रान्स यांनी बुधवारी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद केली आहे. “मला ओमायक्रॉनसंबंधी फार चिंता आहे, हा फार संसर्गजन्य आहे. डेल्टा असतानाच ओमायक्रॉन आल्याने केसेसची त्सुनामी आली आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

“आधीच थकलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर यामुळे खूप तणाव येणार असून आरोग्य यंत्रणा कोसळण्याची भीती आहे,” असंही टेड्रोस म्हणाले. फक्त नव्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नसून अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे हेदेखील एक कारण आहे.