वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने दुसऱ्यांदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अजय रायच उमेदवार होते.

त्यावेळी मोदींनी विक्रमी मताधिक्क्याने अजय राय यांचा पराभव केला होता. आम आदमी पार्टीचे संयोजक आणि आताचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा वाराणसीत मोदींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने मोदींनी वाराणसीतून विजय मिळवला होता.

अजय राय यांनी पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अजय राय भाजपा आणि समाजवादी पार्टीमध्ये होते. वाराणसीमधून त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवली आहे. १९९६ ते २००७ पर्यंत ते तीनवेळा भाजपाकडून आमदार होते. मोदींसारख्या दिग्गज नेत्याविरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. कारण वाराणसीमध्ये त्यांचा तळागाळतील जनतेपर्यंत संर्पक आहे.

भाजपाच्या विद्यार्थी शाखेमधून अजय राय यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९९६ साली त्यांनी कोलासला विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा आमदारकी भूषवणाऱ्या नेत्याचा पराभव केला व जायंट किलर ठरले. भाजपाने २००९ साली वाराणसीतून मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी दिल्यानंतर अजय राय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.