BJP Bhajan Lal Sharma Rajasthan New CM : राजस्थानला अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपाने नऊ दिवस विचारमंथन केल्यानंतर पहिल्यांदाच निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. विशेष म्हणजे ही निवड करताना भाजपाने काळजीपूर्वक जातीय गणिते सांभाळली आहेत. भजनलाल शर्मा ब्राह्मण आहेत. तर त्यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री देण्यात येत आहेत. त्यापैकी दिया कुमारी या राजघराण्याशी संबंधित आहेत. तर प्रेमचंद बैरवा हे दलित आहेत.

विशेष म्हणजे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही भाजपाने जातीय समीरकरणांचा विचार केलेला दिसतोय. छत्तीसगडमध्ये आदिवासी जमातीचे प्राबल्य पाहता तिथे विष्णू देव साय यांची निवड केली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रचारादरम्यान जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे करून ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना सत्ता काही मिळाली नाही. तिथे भाजपाने मोहन यादव यांच्यारुपाने ओबीसी मुख्यमंत्री देऊ केला आहे.

हे वाचा >> दिया कुमारी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री; पालकांविरोधात लग्न, नंतर घटस्फोट, असा आहे राजकीय प्रवास

कोण आहेत भजनलाल शर्मा?

५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी असून ते पहिल्यांदाच जयपूरमधील सांगानेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी एकूण १ लाख ४५ हजार १६२ एवढी मते मिळवली असून काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मताधिक्यांने पराभव केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असेलल्या भजनलाल यांनी भाजपा पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले आहे. ते चार वेळा प्रदेश महामंत्री होते. यावेळी त्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देऊन भाजपाने पक्षसंघटनेतील कामाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भजनलाल शर्मा यांनी राजस्थान विद्यापीठातून १९९३ साली राजशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी मिळविलेली आहे.

सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत

भजनलाल शर्मा भरतपूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. मात्र २००३ साली त्यांनी भाजपाच्याच विरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला. त्याआधी त्यांनी आपल्या गावातून सरपंचपदाचीही निवडणूक लढविली मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला होता.

आणखी वाचा >> भजनलाल शर्मा यांच्याकडे संपत्ती किती? माहिती जाणून घ्या

भजनलाल शर्मा यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ नुसार सार्वजनिक कामात लोकसेवकाची अडवणूक करणे आणि दुसरा गुन्हा कलम १४९ अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.

राजस्थान विधानसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत

२५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राजस्थानमधील निकालात मागच्या ३० वर्षांपासून चालत आलेली परंपरा याहीवेळेस कायम राहिली. विद्यमान काँग्रेस सरकारला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात अपयश आले. आतापर्यंत एकाही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळविता आलेली नाही. १९९ सदस्यांच्या विधानसभेत भाजपाने ११५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच स्पष्ट बहुमत असल्यामुळे राजस्थानमध्येही नवा चेहरा दिला जाईल, असा अंदाज होता. त्याप्रमाणे निर्णय झालेला दिसतो.