अहमदाबाद, दिल्ली आणि मुंबईतील लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोटातील संशयित अब्दुल सुभान उस्मान कुरेशी उर्फ तौकिरला दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. जवळपास १० वर्ष पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या अब्दुलला अटक झाल्याने इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेबाबतची महत्त्वपूर्ण माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळणार आहे. ‘अल अरबी’, भारतातील ओसामा बिन लादेन, कासिम अशा टोपणनावांनी ओळखला जाणारा अब्दुल कुरेशी नेमका आहे तरी कोण याचा घेतलेला हा आढावा….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौटुंबिक पार्श्वभूमी
अब्दुल सुभान उस्मान कुरेशीचे आई-वडिल मुळचे उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील. रोजगाराच्या शोधात त्याचे आई-वडिल मुंबईत आले आणि मस्जिद बंदर परिसरात स्थायिक झाले. अब्दुलच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. १९८८ मध्ये कुरेशीने ख्रिश्चन चर्चतर्फे चालवणाऱ्या जाणाऱ्या ख्यातनाम इंग्रजी शाळेतून शिक्षण घेतले. दहावीत त्याला ७६ टक्के मिळाले होते. त्याच्या तिन्ही बहिणींनी कला शाखेत पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. तर त्याचे भाऊ फार शिकलेले नाही. सिमी किंवा अन्य दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध आहे. १९९२ मध्ये दंगलीच्या वातावरणात कुरेशीने नवी मुंबईतील एका ख्यातनाम स्वायत्त विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. १९९५ मध्ये त्याने इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा पूर्ण केले. तो इंजिनिअर असून त्याने बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम केले होते.

पहिला पगार २, ४५० रुपये
मुंबईत १९९६ मध्ये कुरेशीने पहिली नोकरी केली. त्यावेळी त्याचा पगार होता २,४५० रुपये. पण तीन वर्षातच त्याने चांगल्या कामगिरीच्या बळावर बढती मिळवली. विप्रोतर्फे १९९९ मध्ये भारत पेट्रो-केमिकल्ससाठी इन्ट्रानेट इम्प्लिमेंटेशन प्रोग्रेम हाती घेण्यात आला होता. या प्रोजेक्टसाठीही त्याने काम केले होते.

‘सिमी’शी संपर्कात आला अन् नोकरी सोडली
१९९८ मध्ये कुरेशी सिमी या प्रतिबंधित संघटनेशी संपर्कात आला आणि पाहता पाहता तो या संघटनेचा सक्रीय सदस्य झाला. सफदर नागोरीने यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. २००१ मध्ये त्याने नोकरी सोडली. धार्मिक कारणांसाठी नोकरी सोडत असल्याचे कुरेशीने म्हटले होते. दिल्लीतून ‘सिमी’साठी प्रकाशित होणाऱ्या इस्लामिक व्हॉइस या मासिकासाठी त्याने काम केले. उच्चशिक्षण आणि आयटीची उत्तम जाण असल्याने तो ‘सिमी’चा आयटी चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला. सिमीच्या एका कॅम्पमध्येच त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले. यात बॉम्ब कसे तयार करायचे, स्फोट कसा घडवायचा, तपास यंत्रणांनी अटक केल्यावर कशी दिशाभूल करायची याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले होते. सिमीच्या नेत्यांची धरपकड झाल्यानंतर इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेच्या संस्थापक रियाझ भटकळच्या तो संपर्कात आला. पुढे या सर्वांनी मिळून इंडियन मुजाहिद्दीनची स्थापना करत भारतात दहशतवादी हल्ल्यांचे कट आखले. अहमदाबाद, दिल्ली, मुंबई या बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग होता. दिल्ली स्फोटानंतर ‘अल- अरबी’ या नावाने ईमेल पाठवण्यात आले होते. ते मेल देखील कुरेशीनेच पाठवले असावे, असे सांगितले जाते. त्याने इंडियन मुजाहिद्दीनसाठी बॉम्ब तयार करण्याचे काम केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने कुरेशीवर चार लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते.

‘इंडियन मुजाहिद्दीन’ला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे अनेक हस्तक, दहशतवादी आणि संस्थापक सध्या तुरुंगात आहेत किंवा देशाबाहेर आहेत. भारतातील देशातील ‘इंडियन मुजाहिद्दीन’ जाळे पुन्हा सक्रीय करण्याचा त्याचा प्रयत्न होता. यासाठीच गाजीपूरमधील निकटवर्तीयाला भेटण्यासाठी तो भारतात आला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कुरेशी हा सध्या नेपाळमध्ये राहत होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे तो नेपाळमध्ये गेला होता. २०१५ ते २०१७ या कालावधीत तो सौदी अरेबियातही होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is im operative abdul subhan qureshi nia most wanted delhi mumbai ahmedabad bomb blast it face of simi
First published on: 22-01-2018 at 13:37 IST