Who is Jitendra Raghuvanshi in Raja Raghuvanshi Meghalaya honeymoon murder Case : मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेले जोडपे सोनम आणि राजा रघुवंशी हे गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. राजा रघुवंशी याची हत्या झाल्यानंतर सोनम आणि तिच्या काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात जितेंद्र रघुवंशी हे नाव समोर आले आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळताना दिसत आहे.
कोण आहे जितेंद्र रघुवंशी?
जितेंद्र रघुवंशी हा व्यक्ती तो आहे ज्याचे खाते सोनम रघुवंशीने कथितपणे २३ मे रोजी राजा रघुवंशी याच्या हत्त्येसाठी मारेकर्यांना सुरुवातीचे पेमेंट करण्याकरिता वापरले होते. जेव्हा जितेंद्र रघुवंशी याच्याबद्दल सोनमचा भाऊ गोविंद याला प्रश्न करण्यात आला, तेव्हा त्याने बुधवारी माध्यमांना सांगितले की, तो (जितेंद्र रघुवंशी) हा त्याचा भाऊ आहे. पुढे बोलताना गोविंदने सांगितले की, सोनमचे यूपीआय खाते हे जितेंद्रच्या नावावर उघडण्यात आलेले होते. मात्र हे खाते सोनमच्या नावावर का नव्हते याबद्दल त्याने कोणताही खुलासा केला नाही, हिंदुस्तान टाईन्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
जितेंद्र याचे नाव चौकशीत समोर आल्यानंतर सोनमने हवाला मार्गाने व्यवहार केल्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे, तसेच तिच्या कुटुंबाच्या व्यवसायाचा देखील हवालाशी संबंध असल्याचा संशय निर्माण झाला असून तो देखील सध्या चौकशीच्या कक्षेत आला आहे.
मात्र असे असले तरी गोविंदने हे दावे फेटाळून लावले आहेत. जितेंद्र हा त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायातील कनिष्ठ कर्मचारी असून त्याच्या खात्यात त्यांचा पैसा होता ज्याच्या माध्यमातून नेहमी व्यवहार केले जात होते असे त्याने सांगितले, इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी वृत्त दिले आहे.
“आमचे हवालाशी काहीही देणेघेणे नाही. खोट्या गोष्टी रचल्या जात आहेत. जितेंद्र रघुवंशी ज्याचे नाव समोर आले आहे, तो माझा मावस भाऊ असून तो आमच्या कुटुंबाच्या व्यवसायात कनिष्ठ कर्मचारी आहे, तो गोडाऊनमध्ये सामानाचे लोडिंग आणि अनलोडिंगचे काम पाहतो. त्याच्या नावावर असलेल्या खात्यात प्रत्यक्षात आमचे पैसे आहेत जे व्यवसायाच्या दैनंदिन खर्चासाठी वापरले जातात,” असे गोविंद म्हणाला.
गोविंद राजा रघुवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीला
गोविंदने सोनमच्या इंदोर येथील सासरी मंगळवारी भेट दिली आणि राजा रघुवंशी याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्याने राजाच्या हत्येमध्ये त्याची बहीण सोनमच्या कथित सहभागाबद्दल माफी देखील मागितली.
गोविंदने हत्येमागे सोनमचा हात असल्याचे देखील यावेळी म्हटले. “मी सोनमला गाझीपूर येथे अवघ्या दोन मिनिटांसाठी भेटलो आणि तिला जाब विचारला. तिने गुन्हा केला असल्याचे लक्षात येण्यासाठी तिची प्रतिक्रियाच पुरेशी होती,” असे तो म्हणाले
गोविंदने यावेळी त्याच्या कुटुंबाने सोनमशी असलेले सर्व संबंध तोडल्याचेही स्पष्ट केले. इतकेच नाही तर आपण राजा रघुवंशी याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार असेही म्हटले.