Who is Mathura Sridharan? : भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन यांची ओहायोच्या १२व्या सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्या आता फेडरल आणि स्टेट कोर्ट यासह अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात देखील ओहायो राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च अपीलीय वकील असणार आहेत. ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी त्यांनी श्रीधरन यांच्या कामगिरीचे कौतुक देखील केले.

मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर वर्णद्वेशी आणि झेनोफोबिक ट्रोलिंगला उत आल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी मथुरा यांच्या अमेरिकन असण्याबाबत संशय व्यक्त केला, तसेच त्यांनी लावलेल्या टिकलीवरून देखील त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

“ती ख्रिश्चन आहे का? हाच माझ्यासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. तिच्या कपाळावरील टिकली पाहाता, मला चिंता वाटते की ती नाहीये. आपले नेते निवडताना हे आपल्यासाठी महत्त्वाचे असले पाहिजे. ज्ञानाची सुरूवात ही देवाच्या भीतीपासून होते. ते प्रभावीपणे कसे आपले नेतृत्व करतील?,” अशी कमेंट एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर केली आहे. “आणखी एक अमेरिकन नोकरी परदेशी लोकांना देण्यात आली,” असे दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे.

दुसऱ्या एका ट्रोलने तिच्या भारताशी असलेल्या संबंधाचा उल्लेख केला. “ती भारतीय आहे. त्या सर्वांची इतर भारतीयांशी प्रथम निष्ठा आहे. भयानक निवड. पूर्णपणे अ-अमेरिकन. रिपब्लिकन पक्ष दयनीय आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

आणखी एकाने मथुरा श्रीधरन यांच्या भारताशी असलेल्या संबंधांवर बोट ठेवत लिहिले आहे की, “ती भारतीय आहे. त्या सर्वांची निष्ठा ही पहिल्यांदा इतर भारतीयांसाठी असते. भीषण निवड. पूर्णपणे अन-अमेरिकन. जीओपी दयनीय आहे.”

दरम्यान मथुरा यांचा नियुक्तीची घोषणा करणाऱ्या ओहायोच्या अॅटर्नी जनरल डेव्ह यॉस्ट यांनी या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे. तसेच मथुरा यांना चुकीच्या पद्धतीने नॉन-अमेरिकन दाखवले जात असल्याचे म्हटले आहे.

“मथुरा या हुशार आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षीय त्यांचा SCOTUS येथील युक्तीवाद जिंकला होता. त्यांनी ज्यांच्या अंतर्गत काम केले त्या दोन्ही SGs (Flowers & Gaiser) यांनी तिची शिफारस केली होती. मी तिला सुरुवातीला जेव्हा नियुक्त केलं तेव्हा सांगितले होते की मला ती माझ्याबरोबर युक्तीवाद करण्यासाठी हवी आहे . ती नेहमीच करते! तिला प्रमोट करण्यासाठी उत्सुक आहे. ती ओहायोची चांगली सेवा करेल,” असे त्यांनी लिहिले।

मात्र मथुरा यांना कमेंट बॉक्समध्ये लक्ष करण्यात आले, आणि यावर यॉस्ट यांनी मथुरा या अमेरिकन नागरिक असल्याचे ठणकावून सांगितले. “काही कमेंट करणाऱ्यांनी चुकीचे मत मांडले आहे की मथुरा या अमेरिकन नाहीत. त्या अमेरिकन नागरिक आहेत, त्यांनी अमेरिकेत जन्मलेल्या नागरिकांचे मूल आहेत. जर त्यांचे नाव किंवा त्वचेचा नैसर्गिक रंग तुम्हाला अडचण वाटत असेल तर, अडचण तिच्यात किंवा तिच्या नियुक्तीमध्ये नाही,” असे ते म्हणाले.

मथुरा श्रीधरन कोण आहेत?

मथुरा श्रीधरन या सध्या डेप्युटी सॉलिसिटर जनरल आणि ओहायो टेन्थ अमेंडमेंट सेंटरच्या प्रमुख म्हणून काम करतात. मथुरा यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ मधून Juris डॉक्टर, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कंप्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी, तसेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अर्थशास्त्र आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कंप्युटर सायन्स या विषयात बॅचलर पदवी घेतली आहे.

सॉलिसीटर्स ऑफिसमध्ये रुजू होण्याच्या आधी त्यांनी यूएस कोर्ट ऑफ अपील (सेकंड सर्किट)चे जज स्टीवन जे. मेनाशी आणि यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट (साउथर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क)चे जज डेबोर्ह ए. बाट्स बॅट्स यांच्याकडे क्लार्क म्हणून काम केले. तसचे त्यांचे लग्न अश्विनी सुरेश यांच्याशी २०१५ साली झाले आहे.