Who was Radhika Yadav? : गुरूग्राम येथील २५ वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राधिकाच्या वडिलांनीच हरियाणाच्या गुरुग्राम येथे राहत्या घराती ही हत्या केल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राधिकाच्या वडिालांनी तिच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. कथितपणे सोशल मीडियावरील एका पोस्टवरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस रिलेशन अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, असे दिसून येत आहे की घरात सोशल मीडिया पोस्टमुळे तणावाचे वातावरण होते. तसेच त्यांनी सांगितले की गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र हे परवाना असलेले पिस्तूल असून ते घरातून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान गोळ्या घालण्यात आल्यानंतर राधिका यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
कोण होती राधिका यादव?
२३ मार्च २००० साली जन्मलेली राधिका ही प्रतिभावान टेनिसपटू होती आणि तिची इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून ११३वी रँक होती. आयटीएफ डबल्समध्ये देखील टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा क्रमांक होता.
महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणात पाचव्या स्थानावर होती असे सांगितले जाते. राधिका यादव ही तिच्या बरोबरीच्या खेळाडूंपैकी ‘टॉप प्लेयर’ म्हणून म्हणून उदयास येत होती, असे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.
राधिका यादव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवत असे, पण दुर्दैवाने हेच राधिकाच्या हत्येचे कारण बनल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या रीलमुळे राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. राधिकाच्या वडिलांनी परवाना असलेल्या पिस्तूलाने तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
राधिकाचे माजी प्रशिक्षक मनोज भारद्वाज यांनी या प्रकाराबद्दल राधिकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि हे मोठे नुकासान असल्याचे म्हटले आहे. राधिका ही अत्यंत हुशार आणि होतकरू खेळाडू होती. तिने स्कॉटीश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्याच्या आधी २०१८ मध्ये तिने कॉमर्समधून १२वी उत्तीर्ण केली होती आणि शाळेच्या दिवसांपासूनच तिने टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती.