बिहारच्या निवडणुकीचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला आहे. जदयू आणि भाजपासह एनडीएच्या घटक पक्षांना २०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. दरम्यान या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांचं घर फुटलं आहे. त्यांची कन्या रोहिणी आचार्यला घरातून आणि पक्षातून हाकलण्यात आलं. दरम्यान रोहिणी आचार्य यांनी आपला आता यादव कुटुंबाशी संबंध नाही असं म्हटलं आहे. तर रोहिणीचे मामा म्हणजेच राबडी देवीचे भाऊ साधू यादव यांनी रोहिणी यांची बाजू घेतली आहे. माझी भाची रोहिणीसह जे घडलं ते योग्य नाही. रोहिणी जे म्हणते आहे ते घडलं आहे आणि ते चुकीचं आहे असंही साधू यादव यांनी म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य यांनी काय म्हटलं आहे?
“एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही. फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने तिच्या आईवडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेनं सोडलं, मला माझं माहेरचं घर सोडावं लागलं, मला अनाथ बनवण्यात आलं. तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडल्यानंतर आता तेज प्रताप यादव यांनी प्रतिक्रिया देत रोहिणी आचार्य यांचा अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे.
साधू यादव काय म्हणाले आहेत?
साधू यादव म्हणाले रोहिणी यादव कुटुंबाची सदस्य आहे हे तिचंही घर आहे. घरातल्या सदस्यांनी घरातले नियम पाळलेच पाहिजेत. जर तुम्ही माझ्या घरात राहात आहात तर तुम्ही माझे नियम पाळणार ननाही का? हे रोहिणीचं घर आहे आणि तिचे आई वडील, भाऊ, बहीण हे सगळे इथे राहतात. तिचा या घरावर पूर्ण हक्क आहे. तिला घर सोडायला लावलं ही बाब योग्य नाही. ती आमच्या कुटुंबातली मोठी मुलगी आहे. तिच्याशी कुणी गैरवर्तन केलं असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे. कुटुंबात जे वाद झाले आहेत ते आम्ही आपसांत मिटवू. जे काही वाद घडले आहेत त्या प्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जाईल असंही साधू यादव यांनी म्हटलं आहे.
तेजस्वी यादव यांच्यावर रोहिणी आचार्य यांची टीका
रोहिणी यादव यांनी म्हटलं आहे की तेजस्वी यादव हे पूर्णपणे संजय यादव यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच पक्षाची रणनीती कमकुवत झाली आहे. संजयच्या मेहुण्याला तेजस्वी यादवने त्याचा पीए. म्हणून का काम दिलं? तसंच मी जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा माझ्यावर चप्पल उगारण्यात आली आणि मला शिव्या देण्यात आल्या. तणाव वाढला तेव्हा रोहिणी आचार्य पाटण्याहून दिल्लीला रवाना झाल्या.
