John Bolton On Donald Trump and PM Modi : डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. भारताने रशियाकडून खजिन तेल खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत ट्रम्प यांनी भारतावरही तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलं. एवढंच नाही तर टॅरिफच्या मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अनेकदा डिवचण्याचा प्रयत्नही केला. मात्र, भारताने ट्रम्प यांच्या दबावाला जुमानलं नाही.
दरम्यान, मागच्या काही दिवसांत ट्रम्प यांचा सूर बदलल्याचं दिसून येत आहे. मात्र, असं असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी एक मोठा दावा केला आहे. जॉन बोल्टन यांनी म्हटलं की, “ट्रम्प आणि मोदी यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी एकदा पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला होता”, असं विधान जॉन बोल्टन यांनी केलं. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
जॉन बोल्टन यांनी म्हटलं की, “दोन्ही देशांमधील व्यापारावर चर्चा करण्यासाठी जे खऱ्या पद्धतीने वाटाघाटी करणारे एकत्र बसत नाहीत, तोपर्यंत ही एक ढोंगी गोष्ट आहे असं मला वाटतं. जी सुरक्षितपणे दुर्लक्षित केली जाऊ शकते. भारत सोशल मीडियावरील धमक्या आणि आवाजाशिवाय कठोर परिश्रम करू शकतो. मी असं म्हणत नाही की हे प्रश्न सहज किंवा लवकर सोडवले जातील. पण मला वाटतं की दोन्ही बाजूंनी सहकार्याची भूमिका असेल तर यावर काम करण्याचा प्रयत्न करू शकतो.”
भारताशी व्यापार करार करणार की नाही? हॉवर्ड लुटनिक यांचं मोठं विधान
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा भाष्य करत अमेरिका भारताशी व्यापार करार करणार की नाही? याविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा संकेत दिले की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्यानंतरच भारताबरोबर अमेरिका व्यापार कराराच्या संदर्भाने पुढे जाऊ शकते.
“जेव्हा भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल, तेव्हा आम्ही त्यांच्यासोबतच्या सर्व समस्या सोडवू. पण भारताने रशियन तेल आयात बंद करावी, त्यावरच पुढील प्रगती अवलंबून आहे”, असं हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवरून भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या तणावानंतर लुटनिक यांचं हे विधान समोर आलं असून अमेरिका-भारत संबंधांमधील तणाव कमी होण्याची शक्यता मानली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय मित्र असं संबोधलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे देखील नरमले असल्याचं बोललं जात आहे.