केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार नारायण राणे स्थान देण्यात आले. त्यानंतर नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा  आभारी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर नवनियुक्त मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन-आशिर्वाद यात्रा गुरुवारपासून मुंबईतून सुरू झाली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाच्या जवाबदारीबाबत भाष्य केलं.

“जन आशिर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आली आणि त्यानी आम्हा सर्वांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितले. जनतेचे आशिर्वाद घेऊन तुमच्या खात्याचा कारभार करा असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. त्यांच्या मार्गदर्शनापासून महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही निघालो आणि पूर्ण मुंबईमध्ये जन आशिर्वाद यात्रा घेऊन गेलो,” असे नारायण राणे यावेळी म्हणाले.

“उद्योग धंद्यात तरुणांनी यावं. रोजगार निर्माण करावे, देशाचं उत्पन्न वाढावं, निर्यात वाढावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी मला बोलावून सांगितलं हे खातं मुद्दाम तुमच्याकडे दिलंय. तुम्ही यामध्ये माझ्या अपेक्षा पूर्ण करा असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे,” असे नारायण राणे म्हणाले.

हे ही वाचा >> मोदींनी निवडलेल्या देशातील कर्तृत्ववान लोकांमध्ये नारायण राणेंना संधी – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेत सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. यावेळी राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अवस्थेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

यावर नारायण राणेंनी उत्तर दिले. “मला कोणासमोर नमस्कार करावा वाटतो हा माझा प्रश्न आहे. गोमूत्र का शिंपडलं काय दुषीत झालं होतं? हे त्यांना विचारा. ते स्मारक ज्या स्थितीत आहे. तिथे जाऊ शकत नाही. मी पॅण्ट वर करुन त्या दलदलीतून आतमध्ये गेलो. दलदलीमध्ये ते स्मारक आहे. अनेक स्मारकं मी पाहिली पण इथे काय आहे. साहेबांचा फोटोही सरळ दिसत नाहीय. बाळासाहेबांच स्मारक हे जागतिक किर्तीचं व्हावं हे माझं उत्तर आहे,” असे नारायण राणे म्हणाले.