केरळच्या गुरुवायुर मंदिरातील तलावात जस्मीन जाफर या मुस्लीम व्लॉगरने आणि बिग बॉस फेम युवतीने पाय धुतले आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मंदिर प्रशासन आता या तलावाचं शुद्धीकरण सुरु केलं आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
बिग बॉसची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जस्मीन जाफरने केरळच्या गुरुवायुर मंदिरातील तलावात पाय धुतले. त्याचा व्हिडीओ तिने शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि वादालाही तोंड फुटलं. दरम्यान मंदिर प्रशासनाने तलावाचं शुद्धिकरण सुरु केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या मंदिरातील तलावामध्ये बिगर हिंदूंना प्रवेश नाही तरीही जस्मिन जाफर तिथे गेली आणि तिने पाय धुतले. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
जस्मीनच्या विरोधात तक्रार दाखल
गुरुवायुर मंदिराचे प्रशासक यांनी जस्मीनच्या विरोधात नियमाचं उल्लंघन केल्याची तक्रारही पोलिसांत दिली आहे. मंदिराच्या शेजारील परिसरात व्हिडीओ शूट करण्यास मज्जाव आहे. लग्नाशी संबंधित व्हिडीओ किंवा फोटो काढण्याची संमती आहे. बाकी कशासाठीच नाही. दरम्यान केरळच्या उच्च न्यायालयानेही मंदिराजवळ रील्स शूट करण्यास मज्जाव केला आहे. शुद्धिकरणाचा सगळा खर्च देवास्वोम फंडातून केला जाणार आहे. त्यानंतर हा खर्च जास्मीन जाफरकडून कायदेशीररित्या भरपाई म्हणून घेतला जाईल.
सहा दिवस चालणार तलावाचं शुद्धिकरण
मंदिर परिसरातील तलावाचं शुद्धिकरण सुरु असल्याने काही काळ भक्तांनाही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शुद्धिकरणाची पूजा सहा दिवस चालणार आहे. ज्यात १८ प्रकारच्या विविध पूजा आहेत. मंदिराचा तलाव हा अत्यंत शुद्ध आणि सात्विक मानला जातो. या तलावात भगवान कृष्णाच्या मूर्तीला स्नान घातलं जातं. या तलावात मुस्लीम युवतीने पाय धुतल्याने हिंदू धर्माचा अपमान झाला आहे असं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.
जस्मीनने मागितली माफी
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणानंतर जस्मीनने या प्रकरणी माफी मागितली आहे. तिने एक व्हिडीओ पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, मी जी चूक केली त्यासाठी मी दिलगीर आहे असं तिने म्हटलं आहे. टाइम्स नाऊनहे वृत्त दिलं आहे.
गुरुवायुर मंदिराची खासियत काय?
गुरुवायुर मंदिराला श्रीकृष्णाची दक्षिणेतील द्वारका असंही म्हटलं जातं. केरळचं हे प्रसिद्ध मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. हे मंदिर बाळकृष्णाला समर्पित आहे. मंदिरातला तलाव आणि रोज होणाऱ्या शीवेली यात्रा ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत.