scorecardresearch

‘या’ स्टार्टअपमध्ये रिलायन्सने केली ९८३ कोटींची गुंतवणूक; जाणून घ्या ही कंपनी नेमकं काय काम करते

पाच वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंपनीमधील सर्वात मोठा वाटा रिल्यान्सने विकत घेतला असून सध्या या व्यवहाराची चांगलीच चर्चा उद्योग जगतात आहे.

Reliance buy Robotics Startup Addverb
सध्या उद्योग क्षेत्रामध्ये या डीलची चर्चा आहे. (प्रातिनिधिक फोटो) (उजवीकडील फोटो अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीच्या सौजन्याने साभार)

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असणाऱ्या मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने भारतामधील एक स्टार्टअप कंपनी विकत घेतलीय. अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजी असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीमधील ५४ टक्के शेअर्स रिलायन्सने विकत घेतले आहेत. यासाठी कंपनीने १३२ मिलीयन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ९८३ कोटी रुपये मोजले आहेत.

ही कंपनी खास का?
नोएडामध्ये मुख्यालय असणारी अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज ही एक स्टार्टअप कंपनी असून ते रोबोटिक्स क्षेत्रात काम करतात. ई कॉमर्सशी संबंधित गोदामे आणि वीजनिर्मिती अधिक सक्षम करण्यासाठी उपयोगी पडणारे रोबोटीक सिस्टीम ही कंपनी बनवते. पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने आतापर्यंत अनेक सॉफ्टवेअर आणि रोबोटिक सिस्टीम डिझाइन करुन त्या वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवल्या आहेत. रोबोटिक्समधील सर्वच क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जगातील फार मोजक्या कंपन्यांमध्ये या कंपनीची समावेश होतो. म्हणजेच जगभरामध्ये रोबोटिक्ससंदर्भात अनेक कंपन्या आहेत पण स्वत: सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही क्षेत्रांमध्ये असणाऱ्या कंपन्या तुलनेने कमी आहेत. अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज या दोन्ही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी कार्यरत आहे.

नक्की पाहा हे फोटो >> “टीना या घरची सून होऊ शकत नसेल तर…”; अनिल अंबानींनी धीरुभाईंना दिला होता इशारा

स्मार्ट गोदामं…
इतकच नाही तर रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योग समुहाने मोठी गुंतवणूक केलेल्या अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीजने अनेक बड्या कंपन्यांसाठी स्मार्ट गोदामं उभी केली आहेत. यात फ्लिपकार्ट, एचयूएल, एशियन पेंट्स, कोका-कोला, पेप्सी, आयटीसी, मारिको यासारख्या बड्या कंपन्यांना स्मार्ट गोदामं उभी करण्यासाठी अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीजने हातभार लावलाय. रिलायन्सने या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कंपनीची किंमत २७० मिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेलीय. ही माहिती अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीजचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या संगीत कुमार यांनी इकनॉमिक टाइम्सशी बोलताना दिलीय.

रिलायन्सला यामध्ये रस का?
सध्या भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये अ‍ॅमेझॉन आणि इतरही परदेशी कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर आता रिलायन्सही माहिती तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नोलॉजी क्षेत्रामधील आपली गुंतवणूक वाढवण्यासाठी वेगाने पावले उचलताना दिसत आहे. अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज कंपनी आताच देशभरामधील रिलायन्सच्या एक डझनहून अधिक गोदामांमध्ये स्मार्ट सोल्यूशन सेवा पुरवते. यामध्ये जिओ मार्टवरील ऑनलाइन किराणा सेवा पुरवाणी गोदामं, फॅशन क्षेत्रातील एजिओची गोदामं, ऑनलाइन औषध सेवा पुरवणाऱ्या नेटमेड्सची गोदामांमध्ये या कंपनीकडून सेवा पुरवली जाते. या गोदामांमधील रोबोटिक कनव्हेअर्स, सेमी ऑटोमॅटिक यंत्रणा तसेच व्हॉइस कमांडवर चालणाऱ्या यंत्रणांची उभारणी आणि देखभाल करण्याचं काम अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज ही कंपनी करते.

नक्की पाहा हे फोटो >> तीन देशांच्या एकत्रित GDP पेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या अंबानींची एका मिनिटाची कमाई पाहून व्हाल थक्क

रिल्यान्सच्या तेल उद्योगांपासून सोलारपर्यंत सगळीकडे हीच कंपनी…
अ‍ॅडव्हर्बच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, “डिजीटल माध्यमांशीसंबंधित सेवा पुरवणाऱ्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरण्याचा रिलायन्सचा विचार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये अनेक ठिकाणी गोदामं सुरु करण्याचा कंपनीचा विचार असून यासाठी त्यांना रोबोटिक्स सिस्टीम मदत करु शकतात.” अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज कंपनीने रिल्यान्सच्या गॅस आणि तेल उद्योगामध्येही सेवा पुरवली आहे. त्यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये असणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ऑटोमॅटिक सिस्टीम डेव्हलप केलीय. त्याचप्रमाणे रिलायन्सच्या सोलारवर चालणाऱ्या प्रकल्पांसाठी आता ही कंपनी काम करत आहे. ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचे ध्येय समोर ठेऊन रिल्यान्स जामनगरमधील या सोलार प्रकल्पामध्ये ८० बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Richest Indian 2021: अदानींची संपत्ती तिप्पटीने वाढली, सर्वात तरुण अब्जाधीश ३५ वर्षांचे तर सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहे…

काम अधिक वेगाने होणार…
अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज रिल्यान्सच्या मदतीने फाइव्ह जी रोबोटिक्स आणि बॅटरी सिस्टीम बनवण्याचा विचार करत असून कार्बन फायबर्सच्या मदतीने ही परवडणारे रोबोट्स बनवण्यात येणार आहे. मार्च २०२२ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीजलचा महसूल ६१ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका असेल असा अंदाज आहे. या कंपनीच्या माध्यमातून गोदामांमधील मांडण्याची देखभाल करणारे, वस्तू नीट मांडून ठेवणारे रोबोट्स तसेच स्वयंचलीत मालवाहू गाड्या, कार्स आणि रोबो शटल्स निर्माण केल्या जात आहेत. या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या गोदामांमध्ये अधिक वेगाने काम होणार आहे.

जगातील सर्वात मोठा रोबोट्सचा कारखाना…
दिल्लीच्या आसपासच्या परिसरामध्ये अ‍ॅडव्हर्ब टेक्नोलॉजीज कंपनी मोठा प्लॉट विकत घेण्याच्या तयारीत असून लवकरच तिथे जगातील सर्वात मोठा रोबोट निर्मिती कारखाना सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे युरोपीयन, अमेरिकन बाजारपेठेमध्ये विस्तार करण्याचा कंपनीचा विचार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why reliance paid over rs 900 crore for robotics startup addverb scsg

ताज्या बातम्या