मी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. पक्षाला वाटत असेल तर माझी हकालपट्टी करावी असे वक्तव्य भाजपाचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो आहे, तसेच त्यांना काही पत्रेही पाठवली आहेत. पण या सगळ्याबाबत त्यांनी कोणतीही उत्तरे दिलेली नाहीत असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. तसेच कोणतीही उत्तरे आणि प्रतिसाद न मिळाल्यानेच राष्ट्र मंच नावाची एक संघटना स्थापन केली असल्याचेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि भाजपा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. पक्षाला मी डोईजड झालो असेल तर त्यांनी माझी हकालपट्टी करावी असेही सिन्हा यांनी सुनावले आहे. यशवंत सिन्हा यांनी आत्तापर्यंत मोदी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका केली आहे, एवढेच नाही तर नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही त्यांनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत असे सिन्हा यांनी म्हटले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या वर्षी सादर झालेला अर्थ संकल्प कृषी आणि ग्रामीण भागासाठी चांगले असेल असे वाटले होते. मात्र या अर्थसंकल्पाने कृषी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या सगळ्याच पातळ्यांवर निराशा केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेले बजेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळच होता. मध्यमवर्ग आणि गरीब यांना या अर्थसंकल्पाचा काहीही फायदा होणार नाही. देशाहिताचे निर्णय घेणारे बजेट सादर करण्याची आणखी एक संधी या सरकारने गमावली आहे असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.