पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यात व्यस्त आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांनी अनेक नेत्यांना पक्षात सामावून घेतले. त्यात किर्ती आझाद यांच्या नावाचाही समावेश आहे. ममता म्हणाल्या की, हा राजकीय प्रवास त्यांना वाराणसी येथे घेऊन जाईल, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. याशिवाय ममता महाराष्ट्रालाही भेट देणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्याबाबत विचारले असता, ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “पंजाबच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने अशी कोणतीही योजना नाही. प्रत्येक वेळी सोनियांना भेटायचेच कशाला? हे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक नाही,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या मोठ्या विस्ताराच्या दरम्यान आले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या सामील झालेले बहुतेक नेते काँग्रेसचे आहेत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये पक्ष बदललेल्या नेत्यांमध्ये गोव्यातील लुइझिन्हो फालेरो, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी, सिलचरच्या माजी काँग्रेस खासदार सुष्मिता देव आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांच्या कन्या यांचा समावेश आहे. याशिवाय मेघालयातील डझनभर आमदार रात्री उशिरा मध्ये तृणमूलमध्ये दाखल झाले.

ममता बॅनर्जी या सोनिया गांधींसोबत चांगले समीकरण जुळवण्यासाठी ओळखल्या जात होत्या, पण आता तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. बंगालच्या काँग्रेस नेत्यांच्या बॅनर्जींबद्दलच्या उदासीनतेमुळे दोन्ही पक्षांमध्ये आणखी एक फूट निर्माण झाली आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाला सहकार्य करण्यास तयार असल्याचे तृणमूलच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

“जर तृणमूल उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी मदत करायची असेल तर आम्ही जाऊ. अखिलेश यादव यांना आमची मदत हवी असेल तर आम्ही त्यांना मदत करू,” असे तृणमूलतर्फे सांगण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी या १ डिसेंबरला काही बिझनेस समिटसाठी मुंबईला येणार आहेत, जिथे त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. कमलपती त्रिपाठी यांचे कुटुंब आता त्यांच्यासोबत असल्याने त्यांनी वाराणसीला जाण्याचा विचार केला आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.