उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे दहा वर्षांची मुलगी तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली असता पोलिसांनी तिला स्थानबद्ध करून ठेवले. या माध्यमात आलेल्या बातम्यांची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. सरन्यायाधीश अल्तामस कबीर यांनी या मुलीला बुलंद शहर पोलिसांनी ती आईवडिलांसमवेत तक्रार नोंदवण्यास गेली असता बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.कबीर यांनी सांगितले, की दहा वर्षांच्या मुलीला पोलीस स्थानबद्ध कसे करू शकतात? राज्य सरकारने याचे सोमवापर्यंत स्पष्टीकरण करावे असा आदेश त्यांनी दिला आहे. रविवारी ही मुलगी जवळच्या जनरल स्टोअरमध्ये आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेली. त्या वेळी आरोपीने तिला बाजूला नेऊन बलात्कार केला व नंतर पळून गेला. नंतर ही मुलगी तिच्या आईवडिलांसमवेत तक्रार देण्यास गेली असता पोलिसांनी महिला ठाण्यात या मुलीला अनेक तास कोठडीत बंद केले. ही घटना उघडकीस आली तेव्हा दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले. नंतर महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुख गायश्री चौहान व उपनिरीक्षक सरिता द्विवेदी यांनाही काढण्यात आले. काल बुलंदशहर पोलिसांनी असा दावा केला, की या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.