scorecardresearch

पाकिस्तानात ‘विकिपीडिया’वर बंदी; ईश्वरनिंदाविषयक मजकूर न हटवल्याने कारवाई

ईश्वरिनदाविषयक मजकूर न हटवल्याने पाकिस्तानमध्ये ‘ऑनलाईन’ विश्वकोष ‘विकिपीडिया’वर बंदी घालण्यात आल्याचे पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाने शनिवारी सांगितले.

Wikipedia
Wikipedia (Image Credit- Wikipedia)

इस्लामाबाद : ईश्वरनिंदाविषयक मजकूर न हटवल्याने पाकिस्तानमध्ये ‘ऑनलाईन’ विश्वकोष ‘विकिपीडिया’वर बंदी घालण्यात आल्याचे पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाने शनिवारी सांगितले.पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (पीटीए) ‘विकिपीडिया’ची सेवा ४८ तासांसाठी अवरुद्ध केल्यानंतर ‘विकिपीडिया’ला काळय़ा यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतरही ‘विकिपीडिया’ने आक्षेपार्ह मजकूर न हटवल्याने ही कारवाई करण्यात आली.पीटीए’चे प्रवक्ते मलाहत ओबेद यांनी सांगितले, की प्रामुख्याने आदेशांचे पालन न केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली आहे. ‘विकिपीडिया’ने आक्षेपार्ह मजकूर हटवल्यानंतर पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाकडून ही बंदी उठवण्याचा विचार होऊ शकतो. हा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी ‘विकिपीडिया’ला नोटीस बजावण्यात आली होती. त्यांची बाजू मांडण्याची संधीही त्यांना देण्यात आली होती. मात्र, ‘विकिपीडिया’ने हा आक्षेपार्ह मजकूर हटवला नाही. तसेच त्यांचे प्रतिनिधी या संदर्भात प्राधिकरणासमोर हजरही राहिले नाहीत.

‘विकिपीडिया’चे स्पष्टीकरण
‘विकिपीडिया’चे संचालन करणाऱ्या ‘विकिमीडिया फाउंडेशन’ने शुक्रवारी स्पष्ट केले, की विकिपीडियावर कोणती सामग्री समाविष्ट केली जाते किंवा ती सामग्री कशी राखावी याबद्दल ते निर्णय घेत नाहीत. माहिती आशयसमृद्ध, प्रभावी आणि तटस्थपणे संकलित होण्यासाठी अनेक जणांचे योगदान असावे, अशी ‘विकिपीडिया’ची रचना केली आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील पाचव्या क्रमांकाचा देश असलेल्या पाकिस्तानमध्ये ‘विकिपीडिया’ सेवा बंद झाल्याने पाकिस्तानचा इतिहास-संस्कृतीविषयक मोफत ज्ञानभांडारापासून पाकिस्तानवासीय वंचित राहतील.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 04:55 IST