Nvidia CEO Jensen Huang on AI Future: सध्या जगभर AI ची चर्चा आहे. जो तो एआय आणि त्यामुळे येणाऱ्या बदलांबाबत बोलतोय, विश्लेषण करतोय किंवा भीती व्यक्त करतोय. यातली सर्वात मोठी भीती म्हणजे AI मुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जाणार! यासंदर्भात एआय कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, त्या त्या सेवा पुरवणारी मंडळी बेरोजगार होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, जगभरातला यशस्वी उद्योग समूह Nvidia चे सीईओ जेन्सन ह्युआंग यांचं मात्र यासंदर्भात वेगळं मत आहे. अमेरिकेतील उद्योगपती चमाथ पॅलिहॅपिटिया यांच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच ह्युआंग यांची मुलाखत झाली. यात त्यांनी एआयच्या भविष्याविषयी भाष्य केलं आहे.

AI बाबत काय म्हणाले जेन्सन ह्युआंग?

जेन्सन ह्युआंग यांनी एआयबाबत बोलताना त्याचा पुढच्या पिढ्यांना फायदाच अधिक होण्याची शक्यता वर्तवली आहे. “हल्लीच्या एआयच्या युगात प्रत्येकदण एक प्रोग्रॅमर आहे. कोडिंगच्या भाषांपैकी सी++, पायथन अशा पारंपरिक भाषा आता अस्तंगत होत चालल्या आहेत. यासाठी आता लोकांना फक्त एआयशी बोलायचं आहे. AI मुळे आता प्रत्येकजण एक कलाकार आहे. प्रत्येकजण एक लेखत आहे”, असं जेन्सन ह्युआंग म्हणाले.

एआय लोकांच्या नोकऱ्या खाणार?

दरम्यान, एआयमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जातील, हा दावा जेन्सन ह्युआंग यांनी खोडून काढला आहे. “माझ्याबाबती बोलायचं झाल्यास एआयमुळे नवनवीन नोकऱ्या तयार होत आहेत. एआयमुळे लोक अशा गोष्टी तयार करू लागले आहेत, ज्या इतर लोक विकत घेऊ इच्छितात. यामुळे आणखी प्रगती, आणखी नोकऱ्या तयार होत आहेत. आणि हे सगळं एकत्र चाललं आहे. AI हा वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानांचा समतोल साधणारा सर्वकालिक महान घटक आहे”, अशा शब्दांत जेन्सन ह्युआंग यांनी एआयबाबत भाष्य केलं.

येत्या पाच वर्षांसाठी AI बाबत भाकित

जेन्सन ह्युआंग यांनी या मुलाखतीत एआयबाबत भाकितही वर्तवलं आहे. “इंटरनेटने गेल्या २० वर्षांत जेवढ्या नोकऱ्या तयार केल्या, त्यापेक्षा जास्त नोकऱ्या एआय येत्या पाच वर्षांत तयार करेल”, असं ते म्हणाले. “खरंतर आपण त्या नोकऱ्या तयार करण्यासाठी पुरेशा वेगाने काम करत नाही आहोत याची मला काळजी वाटतेय. जे कुणी आत्ता एआयचा वापर करत नाही आहेत, ते लवकरच असा वापर करू शकणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये आपली नोकरी गमावून बसतील”, अशी भीतीही जेन्सन ह्युआंग यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भविष्यात प्रत्येक कंपनीच्या दोन शाखा

दरम्यान, जेन्सन ह्युआंग यांनी भविष्यातील कंपन्यांच्या धोरणांवरही अंदाज वर्तवला. भविष्यात प्रत्येक कंपनी दोन प्रकारच्या शाखांद्वारे आपलं काम करेल असं ते म्हणाले. त्यात पहिली शाखा प्रत्यक्ष अस्तित्वात असणारी, प्रत्यक्ष उत्पादन करणारी तर दुसरी शाखा ऑनलाईन स्वरूपात काम करणारी असेल, असंही त्यांनी नमूद केलं. यासाठी त्यांनी एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं उदाहरण दिलं. “टेस्ला एका फॅक्टरीत कारचं उत्पादन करते तर दुसऱ्या फॅक्टरीत त्या कारसाठी लागणाऱ्या एआय यंत्रणेचं उत्पादन करते”, असं ते म्हणाले.