गेल्या आठवड्यात अमेरिकेसह १६ देशातील राजदूतांच्या शिष्टमंडळानं जम्मू काश्मीरचा दौरा केला. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर परदेशी राजदूतांचा हा पहिला अधिकृत दौरा होता. याच दौऱ्यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकार टीका केली आहे. “मी जर काश्मीरमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली, तरी मला हैदराबाद विमानतळावर अटक होईल,” असं ओवेसी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणातील नारायणपेठ जिल्ह्यात खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेत ओवेसी यांनी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यावरून टीकास्त्र सोडले. “३७० कलम रद्द करून पाच सहा महिने झाले आहेत. पण, अजूनही जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं मोठ्या गोष्टी सांगतात. काश्मीरमध्ये विकास होत आहे. मात्र, तिथे काहीही सुरू नाही. मोदी सरकार परदेशी राजदूतांना काश्मीरमध्ये घेऊन गेले. तिथे शांतता असल्याचं दाखवलं. पण, मला काश्मीरला जायचं असं मी म्हणालो, तर मला केंद्रीय दलाचे जवान हैदराबाद विमानतळावरच अटक करतील. मी संविधानाची शपथ घेऊनही काश्मीरला जाऊ शकत नाही. मात्र, मोदी अमेरिका आणि इतर देशांचे राजदूत घेऊन जातात,” असं ओवेसी म्हणाले. “जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना अटक करणे ही मोदी सरकारची मोठी चूक होती. त्यानंतर जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवून या सरकारनं दुसरी मोठी चूक केली आहे,” असा आरोपही ओवेसी यांनी केला.

अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांच्यासह १६ देशांच्या राजदूतांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी केली. काही स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली. लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. युरोपीयन संघातील देशांच्या राजदूतांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारने या दौऱ्याचं नियोजन केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will be arrested at hyderabad airport if i say i want to visit kashmir bmh
First published on: 13-01-2020 at 11:30 IST