अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करणार असल्याचे व्हॉट्स अॅपने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. व्हॉट्स अॅपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीची भेट घेऊन अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी उपाय शोधण्यात येईल, असे व्हॉट्स अॅपकडून मदन लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले आहे.

‘व्हॉट्स अॅपकडून त्यांचे प्रतिनिधी पाठवले जाणार आहेत. व्हॉट्स अॅपचे प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची भेट घेतील आणि सर्व गोष्टींबद्दल स्पष्टीकरण देतील,’ असे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. सिब्बल या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात व्हॉट्स अॅपची बाजू मांडत होते. ‘व्हॉट्स अॅपचे अभियंते आणि आणि तंत्रज्ञ समितीची भेट घेऊन सर्व तांत्रिक बाजूंची माहिती देतील. दोन आठवड्यांनंतर व्हॉट्स अॅपचे तंत्रज्ञ आणि अभियंते संबंधित समितीला भेटतील,’ असे कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने ११ एप्रिलला व्हॉट्स अॅपला नोटीस पाठवली होती. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी ई-मेल पाठवल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीला सहाय्य करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. याचिकाकर्त्यांच्या वकील अपर्णा भट यांनी संबंधित प्रकरणात व्हॉट्स अॅपला पक्षकार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात व्हॉट्स अॅपच्या प्रतिनिधींना समितीची भेट घेऊन तांत्रिक बाबी उलगडण्याचे आणि स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

व्हॉट्स अॅपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २२ मार्चला एका समितीची स्थापना केली. या समितीमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि इंटरनेट क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. गुगल इंडिया, मायक्रोसॉफ्ट इंडिया, याहू इंडिया, फेसबुक आणि समाज माध्यमांतील इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संबंधित समितीची १५ दिवसांमध्ये भेट घेऊन अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्याबाबत तोडगा काढावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.