पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते सतत नेहरु-गांधी कुटुंबावर टीका करत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण प्रत्यारोप करताना कधीही नरेंद्र मोदींच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही असं आश्वासन दिलं आहे. आपण नरेंद्र मोदींना प्रेमाने पराभव करु, पण कधीच त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.

‘नरेंद्र मोदी फार द्वेषाने बोलतात. त्यांनी माझे वडील, आजी आणि आजोबांचा अपमान केला. पण मी आयुष्यात कधीही त्यांच्या कुटुंबावर, आई, वडिलांवर टिप्पणी करणार नाही. मृत्यू पत्करेन, पण त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही’, असं राहुल गांधी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

‘कारण मी आरएसएस किंवा भाजपाचा माणूस नाही, पण काँग्रेसचा आहे. त्यांच्या द्वेषाला मी प्रेमाने उत्तर देईन. गळाभेट घेत, प्रेमाने आम्ही नरेंद्र मोदींचा पराभव करु’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

याआधी राहुल गांधी यांनी मोदीजी पावसामुळे लढाऊ विमानं रडारवरून गायब होतात का? असा प्रश्न विचारत खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत, एअर स्ट्राईकच्या आधी ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते. मात्र भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला दिल्याचं मोदी म्हटले होते. याच वक्तव्यावरून राहुल गांधी यांन पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली. खराब हवामानामुळे जर विमानं रडारवर दिसत नाहीत तर मग पाऊस पडल्यावर ही विमानं गायब होतात का? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.

तुम्ही जनतेला आंबे कसे खाता ते सांगितलं, कुर्ता कसा घालायचा हे शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेरोजगारीचं काय? वर्षाला २ कोटी रोजगारांचं आश्वासन दिलं होतं त्याचं नेमकं काय झालं? याचंही उत्तर द्या असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.