कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एकाच मंचावर दिसले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी टीडीपी काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्याचमुळे या संदर्भात उपमुख्यमंत्री के. ई. कृष्णमूर्ती यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना असे काही घडले तर मी गळफास घेऊन आत्महत्या करेन असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधी यांना एकाच मंचावर पाहिल्यावर नायडू पुन्हा एन. टी. रामाराव यांच्या दिशेने जात नाहीत अशी टीका भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी केली होती. घराणेशाही राबवणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरलेल्या पक्षाकडे नायडू यांचा कल दिसून येतो आहे असेही त्यांनी म्हटले होते. आमच्या घोषणेप्रमाणेच एन. टी. रामाराव यांनाही काँग्रेसची घराणेशाही नकोच होती. त्याचसाठी त्यांनी टीडीपीची स्थापना केली. मात्र चंद्राबाबू यांना पक्षाच्या मूळ विचारसरणीचा विसर पडलेला दिसतो आहे असेही त्यांनी म्हटले.