Kerala nurse Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, निमिषा प्रियाला दिली जाणारी फाशीची शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे, त्यामुळे पुढील आदेशापर्यंत निमिषा प्रियाला काहीसा दिलासा मिळालेला आहे. दरम्यान, निमिषा प्रियाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे.

निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सरकारशी संपर्क साधण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्रकरणात दाखल याचिकेवर सरकारसमोर मुद्दे मांडण्यास सांगितलं आहे. तसेच सुनावणीवेळी निमिषा प्रिया प्रकरणातील मृत पीडितांच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी वकिलांनी परवानगी मागितली आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की निमिषा प्रियाच्या फाशीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. तसेच केंद्र सरकारच्यावतीने अटॉर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाला सांगितलं की, “निमिषा प्रियाच्या प्रकरणात सरकार योग्य ते सर्व प्रयत्न करत आहे. प्रियाने सुरक्षितपणे परत यावं अशी सरकारची इच्छा आहे. तसेच या संदर्भात वाटाघाटी सुरू असून तात्काळ निमिषा प्रियाला धोका नाही.” दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी न्यायालयाने आठ आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

निमिषा प्रिया ही २००८ साली कामानिमित्त येमेन येथे गेली होती आणि तिचे कुटुंब केरळमध्येच होते. तिने २०१५ साली मेहदी याच्याबरोबर स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यापूर्वी तिने इतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केलं होतं. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिक व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधीचा कायदा आहे.

येमेनमध्ये क्लिनिक सुरू करण्यासाठी निमिषा प्रिया हिने तलाल अब्दो मेहदीला बरोबर घेतलं. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि निमिषा प्रिया हिने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला. यामधून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर निमिषा प्रियाचा पासपोर्ट मेहदीने घेतला. पासपोर्ट परत घेण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले. पण त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर येमेनमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने निमिषा प्रियाला २०२० साली मृ्त्यूदंडाची शिक्षा दिली. तिच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण २०२३ साली ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. पण आता पुढील आदेशापर्यंत ही फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.