बिहारमध्ये एनडीएला छप्पर फाड के यश मिळालं आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जदयूला २०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राजदचा सूपडा साफ झाला आहे. दरम्यान आता चर्चा सुरु झाली आहे ती मुख्यमंत्री कोण होणार याची. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्या. आता भाजपाला मिळालेल्या जागा जास्त आहेत. दरम्यान आता महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
जदयूकडून करण्यात आलेली पोस्ट डिलिट
निवडणुकीत महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले होते. मात्र, एनडीएमध्ये असा कोणताही निर्णय झालेला नाही. नितीशकुमारच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे, आज जेडीयूकडून मुख्यमंत्रिपदाबाबत ट्विट केलं गेलं. मात्र, काही काळातत डिलिट करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बिहार राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपा मुख्यमंत्र्यांची खुर्ची विराजमान करू शकते. नितीश कुमार निवृत्त होऊ शकतात. त्यामुळे जी स्थिती एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात झाली तीच नितीशकुमार यांची होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी महत्त्वाची विधानं केली आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नितीश कुमार यांच्या नेतृ्त्वात ही निवडणूक झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदाच्या संदर्भात आमचे शीर्षस्थ नेते नरेंद्र मोदी असतील, नितीशजी असतील ते याबाबत निर्णय घेतील. वेळोवेळी अमित शाह यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. या सगळ्याबाबत आमचं पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल आणि शीर्षस्थ नेते याबाबत निर्णय घेतील. आम्हाला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
विनोद तावडे यांचं म्हणणं नेमकं काय?
आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो आहोत. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पाचही पक्ष बसून आम्ही याबाबत निर्णय घेऊ. आम्ही अमुकच मागू, तमूकच करु असं नाही. केंद्रीय नेतृत्त्व याबाबत निर्णय घेत असतं. त्याबाबत पुढच्या चार दिवसांत साधारण चित्र स्पष्ट होईल असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. बिहारच्या मुखयमंत्रिपदासाठी भाजपा आग्रही असेल का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण महाराष्ट्राच्या दोन नेत्यांनी जे सूचक विधान केलं आहे त्यावरुन नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार का? ही चर्चा आता सुरु झाली आहे. आता बिहारची खुर्ची नितीश कुमार राखणार की भाजपा धक्कातंत्र वापरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
