पीटीआय, पाटणा

‘‘महाराष्ट्रातील २०२४च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान गैरप्रकार घडले होते,’’ या आरोपाचा पुनरुच्चार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पाटण्यात केला. केंद्रातील रालोआ सरकारला बिहार विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करायची आहे असा दावा त्यांनी केला. मात्र, आपण असे होऊ देणार नाही असे राहुल म्हणाले.

बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरतपासणीच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीतर्फे पाटण्यात निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप आणि रालोआच्या बाजूने लागण्यासाठी त्यात गैरप्रकार करण्यात आले असा आरोप केला. ‘‘बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरतपासणी करण्याचा उपक्रम हे निवडणूक गैरप्रकाराचे ‘महाराष्ट्र प्रारूप’ आहे, यामुळे केवळ लोकांचा मतदानाचा अधिकारच नाही तर त्यांचे संपूर्ण भविष्य लुबाडले जाईल,’’ असे राहुल म्हणाले. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, भाकपचे सरचिटणीस डी राजा, माकपचे सरचिटणीस एम ए बेबी आणि भाकपचे (माले) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य उपस्थित होते.

नागरिकांचे अधिकार हिरावण्याचा डाव – तेजस्वी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोग हा राजकीय पक्षाचा भाग झाल्याची टीका केली. मतदारयाद्यांच्या फेरतपासणीतून नागरिकांचे अधिकार हिरावले जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

तेजस्वी यादव म्हणाले, ‘‘आधी तुमचे नाव मतदारयादीतून काढले जाईल, मग पेन्शन, शिधापत्रिका काढून घेतले जातील. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाईल. आम्ही हे होऊ देणार नाही. संघ-भाजप-नितीशकुमार यांच्या हुकूमशाही सरकारचा जोरदार पराभव होईल,’’ असा विश्वास तेजस्वी यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने राज्यघटनेचे संरक्षण केले पाहिजे. पण ते भाजपच्या सूचनांप्रमाणे काम करत आहेत. या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती भाजपने केली आहे. मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी हा निवडणूक चोरण्याचा प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाला मतदारांचा, विशेषत: तरुणांचा अधिकार लुबाडू देणार नाही. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांचे दबावतंत्र, भाजपची टीका

नवी दिल्ली : पाटण्यामध्ये विरोधकांनी काढलेला मोर्चा हा मतदारयाद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावर न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका भाजपने बुधवारी केली. विरोधकांना बिहारमध्ये रोहिंग्यांसह इतर बेकायदा घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा आहे का असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विचारला.