नवी दिल्ली : संविधान, अदानी, डॉ. आंबेडकर अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांमुळे वादळी ठरलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संस्थगित झाले. अधिवेशन संपल्यानंतर लोकसभाध्यक्षांच्या दालनात होणाऱ्या परंपरागत चहापानावर विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी बहिष्कार टाकला.

अधिवेशनादरम्यान विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये कितीही वाद वा मतभेद झाले तरी, लोकसभाध्यक्षांच्या दालनातील चहापानासाठी विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहतात. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, इतर पक्षांचे गटनेते यांच्यामध्ये चहापानाच्या निमित्ताने संवाद होत असतो. मात्र, या वेळी ही परंपरा खंडित झाली. डॉ. आंबेडकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये गुरुवारी झालेल्या संघर्षानंतर भाजपने राहुल गांधींविरोधात गुन्हे दाखल केले. काँग्रेसच्या खासदारांविरोधात गुन्हे दाखल होत असतील तर लोकसभाध्यक्षांच्या चहापानाला कशासाठी उपस्थित राहायचे, असे काँग्रेसचे म्हणणे होते.

हेही वाचा >>>Donald Trump : “तेल आणि गॅस अमेरिकेकडूनच विकत घ्या, नाहीतर…” डोनाल्ड ट्रम्प यांची नवी धमकी कोणाला?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान केला असून पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शुक्रवारी काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी लावून धरली. विरोधी नेत्यांनी आंबेडकरांची छायाचित्रे हातात घेऊन विजय चौकातून संसदेच्या आवारातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर शहांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विरोधकांच्या मोर्चाला भाजप व ‘एनडीए’ आघाडीतील सदस्यांनीही संसदेच्या आवारात घोषणाबाजी करून प्रत्युत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ सुरू झाला. या गोंधळातच लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.