Crime News : पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय आल्याने पूर्व दिल्लीत राहणार्‍या एका २६ वर्षीय महिलेने एक बनावट इंस्टाग्राम प्रोफाईल बनवली आणि स्वत:च्या नवऱ्याला फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती. या प्रकारामुळे या महिलेला अटक करण्यात आली आहे.

फेक प्रोफाईल बनवल्यामुळे ही महिला चांगलीच अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. या महिलेला मंगळवारी अटक करण्यात आली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या पतीबरोबर ज्या महिलेचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता, ती महिला असल्याचा बनाव करून तिचे मॉर्फ केलेले फोटो अपलोड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३० वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या महिलेने कोणीतरी तिच्या नावाने फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवल्याचा आणि तिचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट करत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या अकाउंटशी लिंक असलेले सीम कार्ड शोधून काढले. हे सिम गाजीपूरमध्ये रजिस्टर असल्याचे आढळून आले, त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला आणि महिलेला अटक करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, २०२३ मध्ये आरोपीचे लग्न नांगलोई येथे काम करणाऱ्या आणि त्याच्या एका नातेवाईकाबरोबर राहणाऱ्या एका पुरूषाशी झाले होते.

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तक्रारदार आणि तिचा पती यांचा जुना फोटो पाहिल्यापासून त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याचा संशय घेत होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “हा फोटो त्यांच्या लग्नाच्या आधी काढलेला होता. त्यानंतर आरोपी महिलेने पाहिले की तिचा पती आणि तक्रारदार महिला हे एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात.”

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेने तिच्या पतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लॉग इन केले आणि तक्रारदाराला अश्लील मेसेज पाठवले, त्यानंतर तक्रारदार महिलेनी त्याचे प्रोफाइल ब्लॉक केले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिलेचे बनावट प्रोफाइल तयार केल्याचा आरोप आहे.

“तिने तक्रारदारा महिलेच्या अकाउंटवरून फोटो घेतले आणि ते बनावट अकाउंटवर पोस्ट करण्यासाठी मॉर्फ केले. त्यानंतर तिने तिच्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि त्यानुसार अकाउंट तयार करण्यासाठी इन्स्टाग्रामवर तक्रारदारा महिलेच्या मित्रांशी बोलण्यास सुरूवात केली ,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आरोपी महिलेने तिच्या पतीला फॉलो रिक्वेस्ट पाठवली. तिला तो फॉलो रिक्वेस्ट स्वीकारतो की नाही ते पाहायचे होते. “चौकशीदरम्यान तिच्या पतीने सांगितले की त्याला बनावट खात्याबद्दल माहिती नव्हती आणि त्याला तक्रारदाराने ब्लॉक केल्याचेही लक्षात आले नाही,” असे पोलिसांनी सांगितले.