बरं नसल्यावर एक दिवस घरात राहणे अवघड होणाऱ्या सामान्यांना हे वाचून नक्कीच धक्का बसेल. गोव्यातील एका महिलेला २० वर्षांपासून तिच्या कुटुंबियांनी एका खोलीत कोंडून ठेवले होते. विशेष म्हणजे हे कृत्य या महिलेच्या आई आणि भावानेच केल्याचे समोर आले आहे. आता यामागे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नसून उत्तर गोव्यातील सांक्वेलिम या गावात ही घटना घडली आहे. इतके वर्ष ही महिला एका खोलीत कशी राहीली असेल याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस आणि जिल्हा सर्व्हीस अथॉरिटीचे कार्यकर्ते यांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी या महिलेची सुटका केली.
२० वर्षांपासून एका बंद खोलीत राहील्याने या महिलेची अवस्था अतिशय वाईट झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना या महिलेच्या एका भावाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेला ती महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासून अशाप्रकारे खोलीत बंद करण्यात आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल कऱण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. मात्र महिलेची तब्येत ठिक झाली की पुढील चौकशी आणि कारवाई करण्यात येईल असे बिचोलिम पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय दळवी यांनी सांगितले. याआधीही पणजीमध्ये एका महिलेला तिचे २ भाऊ आणि त्यांच्या पत्नींनी अशाच पद्धतीने कोंडून ठेवल्याची घटना समोर आली होती.