तमिळनाडूच्या कृष्णगिरी येथे एका २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेच्या पतीने यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून तिची घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसूतीदरम्यान झालेल्या रक्तस्त्रावामुळे पीडित महिलेचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित महिलेच्या पतीने YouTube वर प्रसूतीचं तंत्र शिकून आपल्या पत्नीची घरीच नैसर्गिक पद्धतीने प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने चुकीच्या पद्धतीने नाळ कापली. यामुळे महिलेचा प्रसूतीवेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, लोगनायकी असं मृत महिलेचं नाव आहे. त्या पोचमपल्लीजवळील पुलीमपट्टी येथील रहिवासी होत्या. त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर पती मधेश यांनी त्यांची प्रसूती घरीच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी चुकीच्या पद्धतीने नाळ कापल्याने महिलेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्या बेशुद्धावस्थेत पडल्या. यानंतर पीडितेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णलयात येताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथील वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.