करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सोमवारी जयपूरमधून या महिलेला अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. याआधी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये दोन शूटर्स आहेत. या तिघांनाही न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी याच हत्या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. करणी सेनेचे प्रमुख सुखदेव गोगामेडी यांची ५ डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या म्हणजे एक पूर्वनियोजित कट होता. या कटात सहभागी असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी काय म्हटलं आहे?

जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा सैनी आणि तिचा नवरा महेंद्र मेघवाल या दोघांनी गोगामेडींच्या हल्लेखोरांना शस्त्रं पुरवली होती. नितीन फौजी, रोहित राठोड आणि उधम सिंग या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी फौजी हा पूजा सैनी आणि महेंद्र मेघवाल यांच्या घरात भाडे तत्त्वावर राहात होता. महेंद्र मेघवालचा साथीदार समीर हा पळून गेला आहे त्याचाही तपास आम्ही करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त काय म्हणाले?

अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाशचंद्र बिश्नोई यांनी सांगितलं की २८ नोव्हेंबरच्या रात्री नितीन फौजी हा मेघवालला भेटण्यासाठी टॅक्सीने जयपूरला आला. त्यानंतर मेघवालने त्याला एका घरात भाडे तत्वावर ठेवलं होतं. हा भाग जगतपुरा येथील होता. मेघवाल आणि फौजी हे गँगस्टर रोहित गोदाराच्या संपर्कात होते असंही पोलिसांनी सांगितलं आहे. पूजा सैलानी ही नितीन फौजीला जेवण बनवून द्यायची असंही पोलिसांनी सांगितलं आहे तसंच कटातही तिचा सहभाग होता असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

जयपूरमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर त्यांच्या पत्नीने आता हा आरोप केला आहे की राजस्थानचे तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्य पोलीस प्रमुख यांना काहीवेळा पत्र लिहून सुरक्षा मागितली होती मात्र गोगामेडी यांना सुरक्षा पुरवली गेली नाही. गोगामेडी यांच्या जिवाला धोका आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते सामाजिक काम करत आहेत त्यामुळे धमक्या आल्या आहेत असं पत्रात लिहिलं होतं तरीही याकडे डोळेझाक केली गेली असा आरोप गोगामेडी यांच्या पत्नी शीला शेखावत यांनी केला आहे.