बैरुत : पश्चिम आशियामधील इराक, सीरिया आणि लेबनॉन या युद्धग्रस्त आणि अंतर्गत संघर्षग्रस्त देशांसाठी एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेचे कर्ज मंजूर केले असल्याचे जागतिक बँकेने बुधवारी सांगितले. पायाभूत सुविधा आणि पुनर्बांधणीचे प्रकल्प यासाठी हे कर्ज असल्याची माहिती बँकेने दिली.
इराकला सर्वाधिक म्हणजे ९३ कोटी डॉलर मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारणे, देशांतर्गत व्यापाराला चालना देणे, रोजगारनिर्मिती आणि अर्थकारणात विविधता आणणे यासाठी रकमेचा वापर केला जाणार आहे. ‘इराक रेल्वेज एक्स्टेन्शन अँड मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट’च्या माध्यमातून उत्तर इराकमधील मोसूल शहर आणि दक्षिण इराकमधील पर्शियाच्या आखातात असलेले उम कस्रा बंदर यांच्यादरम्यान प्रवासी सेवा सुधारणे आणि मालवाहतूक वाढवली जाईल असे जागतिक बँकेने सांगितले.
सीरियाला १४.६ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर झाले असून त्याचा वापर मुख्यत: विश्वसनीय आणि किफायतशीर विद्याुतपुरवठा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यासाठी केला जाईल. युद्धकाळात नुकसान झालेल्या वीजवाहक तारा आणि रोहित्रांची उपकेंद्रे यांचे पुनर्वसन केले जाईल. सीरियाने गेल्या महिन्यात कतार, तुर्की आणि अमेरिकेतील कंपन्यांबरोबर पाच हजार मेगावॅट ऊर्जा प्रकल्पांसाठी करार केला आहे.
लेबनॉनलाही गेल्या १४ महिन्यांपासून इस्रायल-हेजबोला युद्धाचा फटका बसत असून त्यांना २५ कोटी डॉलर कर्ज दिले जाणार आहे. तेथील नुकसानग्रस्त महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जीवनावश्यक सेवांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी याचा वापर होईल.
इराकची वाटचाल पुनर्बांधणीकडून विकासाच्या दिशेने होत आहे. अशा वेळी वाढीव व्यापार आणि जोडणीमुळे वाढीला चालना मिळू शकेल, रोजगारनिर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी होईल. – जीन-ख्रिास्तोफ कॅरेट, संचालक, जागतिक बँक