श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर ३४ धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपच्या भेदक स्विंग गोलंदाजीने मंगळवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्यामुळे श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे अफगाणिस्तानवर ३४ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तेव्हा अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी केलेली धमाल ही जास्त चर्चेचा विषय ठरला आहे.

ICC ने ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजाद आणि फिरकीपटू रशीद खान हे सलमान खानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. याबोरबरच ICC ने व्हिडीओ ला रंजक असे कॅप्शन दिले आहे. जर सर्वात जास्त मजा-धमाल-मस्ती करणाऱ्या संघाला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद द्यायचे असते, तर अफगाणिस्तानचा संघच विजेता ठरला असता, असे कॅप्शन देखील या व्हिडिओवर देण्यात आले आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर कुशल परेरा आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांनी श्रीलंकेला शानदार सुरुवात करून दिली. परेराने ४२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. या दोघांनी १३ षटकांत ९२ धावांची सलामी दिली, मात्र नबीने करुणारत्नेला ३० धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर डावाच्या २२व्या षटकात नबीने कमाल करत चक्क तीन फलंदाजांना माघारी पाठवले. सर्वप्रथम त्याने लहिरु थिरिमानेचा (२५) त्रिफळा उडवला. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने कुशल मेंडिसला स्लीपमध्ये (२) उभ्या असलेल्या रेहमत शाहकडे झेल देण्यास भाग पाडले, तर सहाव्या म्हणजेच अखेरच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजलासुद्धा शून्यावरच रेहमतकरवी झेलबाद करून श्रीलंकेची १ बाद १४४ धावांवरून ४ बाद १४६ धावा अशी बिकट अवस्था केली.

त्यानंतर रशीद खानने ३३व्या षटकात परेराचा बळी मिळवत श्रीलंकेच्या चिंता आणखी वाढवल्या. आठ चौकारांसह ७८ धावा करणारा परेरा बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला, परंतु त्यानंतर पावसाच्या आगमनामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली तेव्हा दौलत व रशीदने झटपट उर्वरित बळी मिळवून लंकेचा डाव ३६.५ षटकांत २०१ धावांत गुंडाळला.

डकवर्थ-लुइस नियमानुसार अफगाणिस्तानपुढे ४१ षटकांत १८७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. अफगाणिस्तानचे सलामीवीर अहमद शहझाद (७) आणि हजरतुल्ला झझाई (३०) यांनी अवघ्या चार षटकांत ३४ धावा फटकावल्या. परंतु अनुभवी लसिथ मलिंगाने ही जोडी फोडली. नवव्या षटकात प्रदीपचे गोलंदाजीसाठी आगमन झाले आणि त्याच्या स्विंग माऱ्यापुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. झझाई, हश्मतुल्ला शाहिदी (४), गुलाबदीन नैब (२३) आणि रशीद खान (२) यांचे बळी मिळवत त्याने सामना श्रीलंकेच्या बाजूने फिरवला.