पीटीआय, बुर्ला (ओडिशा)
जगातील सर्वात लांबीचे धरण म्हणून ओळखले जाणारे, ओडिशातील हिराकुड धरण बांधून ६७ वर्षे झाली आहेत. आता या धरणाची सर्वंकष दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे मत या धरणाचे अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून काम केलेले सुधीर कुमार साहू यांनी सोमवारी व्यक्त केले. या धरणाच्या रचनेसंबंधी काही चिंता आहेत, तसेच त्याची क्षमताही वाढवता येईल असे साहू यांनी सांगितले.
हिराकुड धरणाची एकूण मजबुती अजूनही चांगली आहे. मात्र, त्याच्या वरील भागात वरवर तडे पडले आहेत, तसेच काही ठिकाणी पोकळी निर्माण झाली आहे अशी माहिती साहू यांनी दिली. ‘पीटीआय’शी बोलताना साहू म्हणाले की, “आम्ही धरणाची योग्य देखभाल करत आहेत. केंद्रीय मृदा व पदार्थ संशोधन केंद्र, तसेच केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राने त्यासंबंधी चांगले अहवाल दिले आहेत. ते खूप मजबूत आहे. पण त्याच्या वरील बाजूकडे काही तडे आणि पोकळी आहेत.”
हिराकुड धरण ओडिशाच्या संभलपूर येथे महानदी नदीवर बांधले आहे. त्याची लांबी २५.४ किमी इतकी असून त्याच्या पाण्यामुळे ७४३ चौरस किलोमीटर परिसरात कृत्रिम सरोवर निर्माण झाले आहे. आशियातील हे सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. या धरणाचे बांधकाम १९४८मध्ये सुरू झाले आणि ते १९५७मध्ये बांधून पूर्ण झाले होते. स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आलेले हा पहिलाच बहुउद्देशीय प्रकल्प होता. या प्रकल्पाची पायाभरणी तत्कालीन गव्हर्नर सर हॉथॉर्न लुईस यांनी केली होती. त्याचे उद्घाटन १३ जानेवारी १९५७मध्ये करण्यात आले होते. सध्या हे धरण पूरनियंत्रण, सिंचन, उर्जानिर्मिती तसेच औद्योगिक व घरगुती पाणीपुरवठा अशी विविध उद्दिष्ट्ये पार पाडते.