गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आसाममध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आतापर्यंत ३२ जिल्ह्यांतील ५५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. 

मे महिन्याच्या मध्यापासून आसाममध्ये आतापर्यंत दोन टप्प्यांत पूर आला. यामध्ये ८९ जणांचा बळी गेला. मुख्यमंत्री हेमंता बिश्व सरमा यांनी बुधवारी ट्रेनमधून नगांव जिल्ह्याचा दौरा करून येथील पुरामुळे निर्माण झालेल्या स्थितीची माहिती घेतली. नगांव हा पुरामुळे सर्वात अधिक नुकसान झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामधील १५ हजार १८८ जणांनी १४७ मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.

मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, कोपिला नदीला आलेल्या पुरामुळे नगांव जिल्ह्याच्या बहुतांश भागांतील जनजीवनावर परिणाम झाला. भविष्यात असे संकट येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. बराक खोऱ्यातील कछार, करीमगंज आणि हॅलकांडी या जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे. बराक आणि कुशियारा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ही स्थिती असून पुराने मोठा भूभाग व्यापला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान कछार जिल्ह्यात लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी कार्यरत आहे. या जिल्ह्यातील ५०६ गावांतील दोन लाख १६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममधील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांतील ५५ लाख ४२ हजार लोकांना पुराचा तडाखा बसला.

आसाम राज्य नैसर्गिक संकट व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, गेल्या २४ तासांत आणखी सात जणांना पुरासंबंधी घटनांमध्ये प्राणास मुकावे लागले. त्यामुळे पुरामुळे एकूण मृतांची संख्या ८९ झाली. बारपेटा जिल्ह्यात १२ लाख ५१ हजार लोक पुराच्या छायेत आहेत, तर धुबरीमध्ये पाच लाख ९४ हजार आणि दर्राग जिल्ह्यातील पाच लाख ४७ लोकांना पुराचा फटका बसला. सरकारी माहितीनुसार मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२१ महसुली भागांतील ५ हजार ५७७  गावांचे नुकसान झाले आहे. तर ८६२ मदत शिबिरांमध्ये दोन लाख ६२ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे.

काझिरंगा अभयारण्यातील ११ प्राण्यांचा मृत्यू

काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यातील २३३ शिबिरांना पुराचा तडाखा बसला. किमान ११ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. पोबीतोरा अभयारण्यातील २५ पैकी १४ शिबिरांना पुराचा फटका बसला आहे. मात्र या ठिकाणी प्राण्यांच्या मृत्यूचे वृत्त नाही.