भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांसमोर ब्रिजभूषण सिंह याने जबाबही नोंदवला असून त्याच्यावर झालेले आरोप त्याने फेटाळले आहेत. परंतु, ब्रिजभूषण सिंहला अटक होत नाही तोवर जंतरमंतर सोडणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष निरीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीसमोर पीडितांची बाजू ऐकण्यात आली आहे. परंतु, पीडितांची बाजू ऐकताना समितीने तक्रारकर्त्यांनाच सुनावले असल्याची बाब समोर आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवरून या काही कुस्तीपटूंनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

“ब्रिजभूषण सिंह वडिलांसारखे आहेत. त्यांनी कोणत्याही वाईट हेतुने स्पर्श केला नसेल. तसंच, त्यांच्या वागण्यातून कदाचित गैरसमज निर्माण झाला असेल, ते निष्पाप आहेत, असं समितीने पीडितांना सांगितलं. तसंच, महासंघातील ब्रिजभूषण यांच्या जवळचे अनेक सदस्य, प्रशिक्षक भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या इमारतीच्या प्रतिक्षा कक्षात हजर राहिले होते. हे चित्र अत्यंत भितीदायक होतं”, असं एका कुस्तीपटूने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगतिलं. एवढंच नव्हे तर, फक्त महिला सदस्यांसमोर आम्ही म्हणणं मांडू असं पीडितांनी सांगितल्यानंतरही त्यांची विनंती नाकारण्यात आली होती.

बॉक्सर आणि राज्यसभेच्या माजी खासदार मेरी कॉम, एसएआयचे संचालक राधिका श्रीमान, क्रीडा मंत्रालयाचे माजी सीईओ राजेश राजागोपालन, माजी शटरल तृप्ती मुरुगुंडे, ऑलिम्पिक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि जागतिक चॅम्पिअनशिप पदक विजेती बबिता फोगाट या समितीचे सदस्य आहेत. या समितीच्या पहिल्या सुनावणीवेळ प्रत्येक पीडितेला स्वतंत्र हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यामुळे या पीडिता घाबरल्या होत्या. परंतु, त्यानंतरच्या सुनावणीवेळी आम्ही गटाने हजर राहिलो, असंही कुस्तीपटूने सांगितलं. आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या असून १२ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यामध्ये काही पैलवानांचाही समावेश आहे. तसंच, गेल्या आठवड्यात ब्रिजभूषण सिंह याचाही पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे.

हेही वाचा >> आंदोलक कुस्तीगिरांचे परदेशातील ऑलिम्पिकपटूंना पाठिंब्याचे आवाहन

प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न

“ते (निरीक्षण समिती) आम्हाला घाई करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही जे बोलतेय ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होते असं आम्हाला जाणवलं. त्यांना हे प्रकरण लवकर गुंडाळायचं आहे की काय असंही आम्हाला जाणवलं. कारण, विधान पूर्ण होण्याआधीच, आम्हाला पुढे जाण्यास सांगितले जात होते. त्यांनी आमची भावनिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असंही एका कुस्तीपटूने सांगितले. पुरावे सादर करत नाहीत तोवर आमचे हात बांधलेले आहेत, असंही समितीने तक्रारकर्त्यांना सांगितलं. पुराव्यांअभावी आम्ही निकाल देऊ शकत नाही असं समितीचं म्हणणं आहे. परंतु, अत्याचार सुरू असताना कोण रेकॉर्डिंग सुरू ठेवेल, असा सवाल या तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पीडिता त्यांची बाजू मांडत असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद करण्यात आले होते. परंतु, या प्रकरणी श्रीमान यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांच्या जबाबाची नोंद व्हिडीओद्वारे केली आहे. त्यामुळे आता कोणीही स्टेटमेंट बदलू शकत नाही.

हेही वाचा >> प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज पदयात्रे’ला ‘ब्रेक’, नेमकं कारण काय?

ब्रिजभुषण सिंह याच्याविरोधातील लैंगिक छळाच्या अनेक घटनांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. श्वासोच्छवास तपासण्याकरता त्याने स्तन आणि पोटाला स्पर्श केला होता. तसंच, प्रशिक्षण सत्रादरम्यान पीडितेच्या जर्सीलाही हात लावला होता, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर, कुस्तीपटूंनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी पीडितांना कधी न्याय मिळेल हे पाहावं लागणार आहे.