एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर कारवाई करत सक्तवसूली संचालनालय अर्थात ‘ईडी’ने शनिवारी कंपनीची ५,५५१.२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

शाओमी इंडिया ही चीनमधील शाओमी समूहाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, शाओमीची जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यांमध्ये पडून होती. ईडीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने बेकायदेशीररित्या पैसे धाडण्याच्या (रेमिटन्स) केलेल्या सुविधेच्या संदर्भात तपास सुरू केला होता. तर एप्रिलमध्ये या प्रकरणाच्या संदर्भात शाओमीचे जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांची चौकशी केली होती. ईडीने दिलेल्या निवेदनानुसार, कंपनीने २०१४ मध्ये भारतात आपले कार्य सुरू केले आणि २०१५ पासून ‘रेमिटन्स’च्या माध्यमातून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने ५५५१.२७ कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन तीन परकी संस्थांना रॉयल्टीच्या रुपात पाठवले. ज्यात शाओमी समूहाचा देखील समावेश होता. रॉयल्टीच्या माध्यमातून मोठी रक्कम चीनमधील मूळ समूहाच्या सूचनेनुसार पाठवण्यात आल्या. इतर दोन अमेरिकास्थित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील अप्रत्यक्षपणे शाओमी समूहातील घटकांच्या अंतिम फायद्यासाठी वळती करण्यात आली.

कायद्याचे उल्लंघन..

शाओमी इंडियाने रॉयल्टीच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या पैसे मिळवत फेमा कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन करत चीनमधील मूळ कंपनीला फायदा पोहोचवला. शिवाय परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना खोटी माहिती दिल्याचेही ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

तपासातील बाब..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाओमी इंडिया ही एमआय या नाममुद्रेअंतर्गत भारतात मोबाइल फोनची विक्री आणि वितरक म्हणून काम करते. शाओमी इंडिया भारतातील मोबाइल निर्मात्यांकडून पूर्णपणे उत्पादित मोबाईल संच आणि इतर उत्पादने खरेदी करते. मात्र शाओमी इंडियाने तीन परदेशी संस्थांकडून कोणतीही सेवा घेतलेली नसताना देखील त्यांना मोठी रक्कम हस्तांतरित केली असल्याचे ईडीच्या तपासातून पुढे आले आहे.