शिओमी कंपनीचा रेडमी नोट ४ आणि रेडमी ४ ए हा फोन केवळ ऑनलाईन उपलब्ध होता. त्यामुळे हा फोन केवळ विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला खरेदी करावा लागत असे. अनेकदा हा फोन अतिशय कमी वेळात आऊट ऑफ स्टॉक होत असल्याने ग्राहक निराश होत होते. यावर उपाय म्हणून कंपनीने आता या फोनचे प्रीबुकींगही सुरु केले आहे.

कंपनीच्या Mi.com या ऑफीशियल वेबसाईटवर ग्राहकांना हे बुकींग करता येणार आहे. आज (शुक्रवारी) दुपारी १२ वाजल्यापासून या वेबसाईटवर ग्राहकांना हा फोन उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना आतापर्यंत या मोबाईलसाठी आठवडाभर वाट पहावी लागत होती. मात्र आता कोणत्याही प्रतिक्षेशिवाय नागरीक ऑनलाईन फोन बुक करु शकतात. मात्र यामध्ये नागरीकांना फोन खरेदी करताना पूर्ण पेमेंट करावे लागणार आहे. यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय देण्यात आलेला नाही. फोन बुक केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत ग्राहकाला त्याचा फोन शिप केला जाणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले.

स्मार्टफोन शिप होण्याआधी ग्राहकांना तो रद्द करता येऊ शकतो. मात्र एका आयडीवरुन एकच फोन खरेदी करता येणार आहे. शिओमीने रेड मी नोट ४ हा फोन भारतात जानेवारी २०१७ मध्ये लॉंच केला होता. त्याला भारतीय ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत ऑनलाईन खरेदीला उत्तम प्रतिसाद दिला होता.

शिओमी रेड मी नोट ४ हा फोन भारतात ३ प्रकारात उपलब्ध आहे. यात २ जीबी रॅम असणारा ३२ जीबी स्टोरेज असणारा (किंमत ९,९९९), ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज (किंमत १०,९९९) आणि ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज (किंमत १२,९९९) असे तीन प्रकार आहेत. या फोनला मेटलची बॉडी देण्यात आली असून फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर लावण्यात आला आहे, याशिवाय अड्रीनो ५०६ जीपीयूही वापरण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मेमरीला १२८ जीबीपर्यंत वाढविण्यात आले आहे. ५.५ इंचाचा फूल आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा १३ मेगापिक्सल असून पुढील कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे. याला ८५ ची डीग्रीची वाईड अॅंगल लेन्स लावण्यात आली होती.

याशिवाय शिओमी रेड मी ४ ए फोन ६.० मार्शमैलो वर आधारीत असून याचाही डिस्प्ले ५ इंचाचा आहे. १६ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या फोनची मेमरी १२८ पर्यंत वाढविता येणार आहे. या फोनला ३१२० मिलीअॅम्पीयर्सची बॅटरी देण्यात आली असून १३ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल पुढील कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत केवळ ५९९९ इतकी ठेवण्यात आली आहे.

या फोनला ग्राहकांची असणारी मागणी लक्षात घेता आता या फोन खरेदीसाठी ग्राहकांना विशिष्ट दिवसाची वाट पहावी लागणार नाही. तर पाहीजे तेव्हा ऑनलाईन पद्धतीने हा फोन खरेदी करता येणार आहे.