स्वयंघोषित अध्यात्मिक आणि योगगुरु आनंद गिरी महाराज याला दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. आनंद गिरी हा उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील बडे हनुमान मंदिराचा प्रसिद्ध महंत आहे. अटकेनंतर सोमवारी त्याला सिडनी येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्याला २६ जून २०१९ पर्यंत कोठडी सुनावली.
ऑस्ट्रेलियातील एसबीएस न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार सिडनीतील ऑक्झेली पार्क येथून गिरी याला स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली. दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सिडनी पोलिसांच्या माहितीनुसार, गिरी सहा आठवड्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता. आपला नियोजित दौरा आटोपून सोमवारी (दि.६) पुन्हा भारतात जाण्यासाठी तो निघणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ओळखीच्या दोन महिलांवर त्याने अत्याचार केला आहे. २०१६ मध्ये गिरीने ऑस्ट्रेलियातील रुटी हिल या शहरातील एका घरामध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या एका २९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता. तर दुसऱ्या एका घटनेत याच शहरात नोव्हेंबर २०१८ मध्ये अशाच प्रकारे गिरीने प्रार्थनेसाठी आलेल्या एका ३४ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता.
या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आनंद गिरीची वेबसाईटही सध्या बंद करण्यात आली आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याने अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत भेटींचे फोटो अपलोड केलेले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह, योग गुरु रामदेव बाबा यांचा समावेश आहे.