धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि रामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या शहरासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तब्बल ३५० कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केली. ही घोषणा करतानाच योगी यांनी अखिलेश यादव सरकारवर टीकास्त्र सोडले. मागील सरकारने अयोध्येच्या विकासावर लक्ष दिले नाही, असे ते म्हणाले. रामजन्मभूमीचा वाद चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

महंत नृत्य गोपाल दास यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून योगी यांनी अयोध्येला भेट दिली. अयोध्येत रामलिला व्हायलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अयोध्येशी श्रीरामांचे नाव जोडले गेले आहे. लोक कल्याण हा धर्माचा खरा उद्देश आहे. हरिद्वार आणि वाराणसीत होणाऱ्या गंगा आरतीसारखी येथेही सरयू आरती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. २००२ नंतर पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत रामाचे दर्शन घेतले. राम नवमीला २४ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आता वीजपुरवठा करण्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अयोध्येत राबवण्यात येणाऱ्या योजनांचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. राम-जानकी मार्ग लवकरच बांधण्यात येईल. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात स्वच्छतेवर भर देण्यात येईल. शहरात सर्वत्र पथदिवे लावण्यात येतील. या सर्व योजनांसाठी अयोध्येच्या विकासावर सरकार ३५० कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

रामजन्मभूमीच्या वादावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या मुद्द्यावर प्रथमच संवादाची योग्य संधी मिळाली आहे. या मुद्द्यावर चर्चेतूनच तोडगा काढण्यात यावा, असे न्यायालयानेही सूचवले आहे. न्यायालयाने सूचवलेला मार्ग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केले.