राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझीयाबादजवळील लोणी बॉर्डर परिसरात रिक्षामध्ये बसलेल्या वृद्ध व्यक्तीला जय श्री राम न बोलल्यामुळे मारहाण केल्याची घटना ५ जून रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राजकारण तापू लागले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेवरुन टीका केली आहे. तर त्यावर उत्तर देत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत ही घटना राहुल यांनी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. “मी हे मानायला तयार नाही की श्रीरामे खरे भक्त असे काही करु शकतात. अशी क्रूरता मानवतेपासून खूप दूर आहे आणि समाज आणि धर्म दोघांसाठी लज्जास्पद आहे,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर हल्ला; जय श्रीराम बोलण्याची केली जबरदस्ती

राहुल गांधींच्या ट्वीटची खिल्ली उडवत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तुम्ही आयुष्यात कधीही खरं बोलला नाहीत असे म्हटले आहे. “भगवान श्री रामांचा पहिला धडा म्हणजे “सत्य बोला” जे तुम्ही आयुष्यात कधीच केले नाही. पोलिसांनी खरी माहिती दिल्यानंतरही तुम्ही समाजात विष कालवण्यात गुंतलेले आहात याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेच्या लोभात माणुसकीचा अपमान होत आहे. उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान करणे आणि त्यांची बदनामी करणे थांबवा”, असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद येथील लोणी येथे एका मुस्लिम वृद्ध व्यक्तीला मारहाण करुन दाढी कापल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवेश गुर्जरसह तिघांना अटक केली आहे. या मारहाणीत प्रवेश गुर्जर, कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहीद यांचा समावेश होता. गाझियाबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ताईत संबंधित हा वाद होता. लोणी येथे एका मुस्लिम वृद्धाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अब्दुल समद सैफी असे पीडित वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने वयोवृद्ध व्यक्तीला फक्त मारहाण केली नाही, तर दाढीही कापली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता.

या घटनेनंतर सैफी यांनी यासंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला होता. “मी ऑटोरिक्षाने जात होतो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या दोन व्यक्तींनी माझे अपहरण केले. ते मला घेऊन एका जंगलाच्या ठिकाणी गेले आणि मला मारहाण करण्यास सुरवात केली. मी त्यांना सोडण्याची विनंती करत राहिलो. त्यांनी मला वारंवार ‘जय श्री राम’ जप करण्यास सांगितले. त्यांनी माझ्या पाठीवर मारले आणि त्यांनी ‘जय श्री राम’ म्हणायला पाहिजे, असे म्हणायला सांगितले, ”असे सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते.