मोदींसाठी योगी पुन्हा मुख्यमंत्री होणे आवश्यक – अमित शहा

विरोधी पक्षांची सरकारे कौटुंबिक पातळीवर चालत होती, अशी टीका भाजप नेहमी करीत आला आहे

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटत असेल, तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा योगी आदित्यनाथ असावे  लागतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आगामी विधानसभेत योगी आदित्यनाथ असतील असे संकेत त्यांनी दिले आहेत.

 शहा म्हणाले की, २०२२ मधील उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका हा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा पाया ठरतील. शहा यांनी भाजप सदस्यत्व मोहिमेची सुरुवात करताना उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत असलेल्या चर्चाना पूर्णविराम दिला. पक्षाच्या शक्ती केंद्र समन्वयकांपुढे त्यांनी डेफेन्स एक्स्पो मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सांगितले की, ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ ही यापुढे आमची घोषणा राहील.

विरोधी पक्षांची सरकारे कौटुंबिक पातळीवर चालत होती, अशी टीका भाजप नेहमी करीत आला आहे. शहा म्हणाले की, मोदी पंतप्रधान असताना त्यांनी उत्तर प्रदेशला सर्व काही दिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा पाया हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत घातला जाणार आहे. २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत असेल, तर उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही निवडणूक भारताला विश्वगुरू बनवणारी असेल, असे सांगून ते म्हणाले की, दिवाळीनंतर प्रचाराला वेग येईल. पक्ष कार्यकत्र्यांनी कामाला लागावे. कमळाचा ध्वज घेऊन फिरावे. विरोधी पक्षांना आता भाजपची भीती वाटत आहे. उत्तर प्रदेशात भाजपला किमान तीनशे जागा मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, २०१७ मध्ये भाजप सत्तेवर आला. त्याआधी मुघलांची सत्ता असल्यासारखेच होते. उत्तर प्रदेश ही बाबा विश्वनाथ, भगवान राम व भगवान कृष्ण यांची भूमी आहे, याची जाणीव तेव्हा कुणालाच झाली नाही. आमच्या पक्षाने राज्याला खरी ओळख मिळवून दिली. सरकारे कुटुंबासाठी नसतात तर गरिबांची सेवा करण्यासाठी असतात, हे भाजपने दाखवून दिले.

अखिलेश यादव लक्ष्य

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, काही लोक घरात बसले होते, आता निवडणुका येताच नवे कपडे घालून बाहेर पडले आहेत व आम्हीच सरकार स्थापन करू असे सांगत आहेत. अखिलेश यादव यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या राजवटीत ते किती काळ परदेशात राहिले याचा हिशेब लोकांना द्यावा. या लोकांनी त्यांच्यासाठी, कुटुंबासाठी सत्ता राबवली. त्यांचे विचार व्यापक नसून त्यांनी जातीपुरते राजकारण केले. १९९० मध्ये अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला, त्या वेळी मुलायम सिंह यांची राजवट होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yogi adityanath must be cm again for narendra modi pm says amit shah zws