योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री ठरले असून ‘टीम आदित्यनाथ’मध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि २३ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय स्वतंत्र कार्यभार असलेले नऊ राज्यमंत्री आणि १५ राज्यमंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशमधील ४०३ पैकी ३१२ जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्रीपदी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कडव्या हिंदुत्त्ववादी नेत्याची निवड केली आहे. रविवारी लखनौमधील मैदानात आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि उत्तरप्रदेशमध्ये ‘योगी राज’ पर्वाला सुरुवात झाली. राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आदी नेते मंडळी उपस्थित होती.

आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होते. आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये हे मोठे राज्य असल्याने दोन उपमुख्यमंत्री द्यावेत अशी मागणी आदित्यनाथांनी केल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले होते. यानुसार केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केशवप्रसाद मौर्य हे गेल्या चार वर्षांपासून भाजपत सक्रीय असले तरी त्यापूर्वी ते संघ आणि विहिंपशी संबंधित होते. मागासवर्गीय समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. तर स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जाणारे लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांनाही उपमुख्यमंत्रीपदावर संधी देण्यात आली आहे. दिनेश शर्मा हे अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. टीम आदित्यनाथमध्ये ओबीसी समाजातील १७, अनुसूचित जातींमधील सहा, ठाकूर समाजातील सात, ब्राह्मण आणि कायस्थ वैश्य समाजातील प्रत्येकी ८ मंत्री आहेत. याशिवाय जाट समाजातील २ आणि एका मुस्लिम समाजातील नेत्याला मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे.

टीम आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री
केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा – उपमुख्यमंत्री

कॅबिनेट मंत्री
> सूर्यप्रताप शाही
> सुरेश खन्ना
> स्वामी प्रसाद मौर्य
> सतीश महाना
> राजेश अग्रवाल
> रिटा बहुगूणा जोशी (निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपत आल्या, लखनौ कँटमधून त्यांनी मुलायमसिंह यांच्या सूनेचा पराभव केला होता)
> दारासिंह चौहान
> धर्मपाल सिंह
> एस.पी.सिंह- बाघेल
> सत्यदेव चौधरी
> रमापती शास्त्री
> जयप्रकाश सिंह
> बृजेश पाठक
> ओम प्रकाश राजभर
> लक्ष्मी नारायण चौधरी
> चेतन चौहान
> श्रीकांत शर्मा
> सिद्धार्थनाथ सिंह
> मुकूट बिहारी वर्मा
> आशूतोष टंडन
> नंदगोपाल गुप्ता

स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री
> अनुपमा जयस्वाल
> सुरेश राणा
> उपेंद्र तिवारी
> महेंद्रसिंह
> स्वतंत्रदेव सिंह
> भूपेंद्रसिंह चौधरी
> धरमसिंह सैनी
> स्वाती सिंह
> अनिल राजभर

राज्य मंत्री
> गुलाबदेवी
> बलदेव औलाख
> अतूल गर्ग
> संदीप सिंह
> मोहसिन रजा
> अर्चना पांडे
> रणवेंद्र प्रतापसिंह
> मन्नू कोरी
> ज्ञानेंद्र सिंह
> जय प्रकाश निषाद
> गिरीश यादव
> संगीता बलवंत
> नीलकंठ तिवारी
> जयकुमार सिंह जॅकी
> सुरेश पासी