मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली असून अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचा निर्णय झालेला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच यासंबंधी निर्णय घेतील असं नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी या विषयावर मौन सोडत लवकरच मुख्यमंत्री कोण होईल हे तुम्हाला दिसेल असं सांगत थेट नाव सांगणं टाळलं. संसदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आम्ही पक्षातील वेगवेगळ्या लोकांकडून माहिती घेत आहोत. आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जात असून त्यांचं मत जाणून घेत आहोत. तुम्हाला लवकरच कोण मुख्यमंत्री होतोय हे पाहू शकाल’, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मध्य प्रदेश आणि राजस्थान ही हिंदी पट्टय़ातील राज्ये अत्यंत महत्त्वाची असल्याने काँग्रेसकडून या राज्यातील सत्तेची खुर्ची अनुक्रमे कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्याकडेच सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे. ‘राजकीय अनुभवा’च्या ताकदीवर हे दिग्गज अनुक्रमे ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ज्योतिरादित्य आणि पायलट या दोघांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त करून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवला आहे. राजस्थान विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी होऊन त्यात नेतानिवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले.

कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांच्यापैकी आमदारांचा कौल आजमावण्यासाठी राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांना बुधवारी भोपाळला पाठवले. ज्योतिरादित्य हे राहुल यांच्या जवळचे मानले जातात पण, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला काठावर बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला बसपचे दोन, सपाचा एक आणि चार अपक्ष यांना बरोबर घेऊन सरकार चालवावे लागणार असल्याने राजकीय डावपेचात मुरलेला तसेच, प्रशासनाची जाण असलेला मुख्यमंत्री गरजेचा आहे. कमलनाथ यांच्याकडे अनुभव असून त्यांची राज्यव्यापी संपर्क यंत्रणाही आहे. त्यांचे भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. बसपच्या मायावतींनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी कमलनाथ यांनी मायावतींशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते.

राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रचारप्रमुखपदाची धुरा योग्य सांभाळली आहे. त्यांचा तरुण मतदारांशी असलेला संपर्क पक्षासाठी फायद्याचा ठरणार आहे. प्रचारप्रमुख म्हणून अख्खा मध्य प्रदेश त्यांनी पिंजून काढला होता. राहुल यांच्या सभेत ज्योतिरादित्यच प्रामुख्याने त्यांच्या शेजारी उभे राहिलेले दिसले. मात्र, मध्य प्रदेशमधील तिसरे ‘सरदार’ दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्यामागे आपली ताकद लावली असल्याचे समजते. दिग्विजय आणि ज्योतिरादित्य यांच्यातील मतभेद तिकीटवाटपात चव्हाटय़ावर आल्यानंतर राहुल गांधी यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यामुळे संसदीय कामकाज मंत्रीपदाची जबाबदारी कौशल्याने सांभाळलेले कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा काँग्रेस मुख्यालयात बुधवारी होती.

राजस्थानमध्ये काँग्रेसला दोन तृतियांश बहुमत मिळेल असा होरा होता. तसे झाले तर तरुण मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलटच मुख्यमंत्री होतील, असे गृहित धरले गेले होते. मात्र, राजस्थानमध्ये काँग्रेसने जेमतेम बहुमताचा आकडा गाठला आहे. बसपचे ६ आमदार तर अपक्ष तब्बल २० आहेत. त्यांच्या मदतीशिवाय राजस्थानमध्ये स्थिर सरकार देणे अवघड होईल. अशावेळी राज्यावर पकड असलेला नेताच मुख्यमंत्रीपदी निवडला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे दोन वेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलेले अशोक गेहलोत पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे समजते.

राहुल गांधी यांनी गेहलोत यांना पक्षाचे सरचिटणीस नेमून दिल्लीत आणले होते. मात्र, गेहलोत यांचा ओढा राजस्थानकडेच राहिला आहे. समन्वय साधून सत्ता राबवण्याचे कसब असलेला ‘काँग्रेसी’ वळणाचा नेता म्हणुून गेहलोत यांच्याकडे पाहिले जाते. काठाच्या बहुमतावर अपक्षांना आणि बसपला एकत्र घेऊन राज्य सांभाळण्याची कुवत गेहलोत यांच्याकडे आहे. शिवाय, अन्य काँग्रेस नेत्यांप्रमाणे अजूनही महत्त्वाकांक्षी असल्याने ते मुख्यमंत्रीपदासाठी आपली ताकद पणाला लावतील. अशा स्थितीत अननुभवी सचिन पायलट यांच्यापेक्षा गेहलोत यांचीच निवड करणे राहुल गांधी यांना भाग पडेल, असे सांगितले जाते.

मात्र, तरुण पिढीला संधी देण्याकडे राहुल यांचा कल असल्याने सुरुवातीपासून सचिन पायलट यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले गेले. २०० पैकी १२०च्या आसपास जागा काँग्रेसला मिळाल्या असत्या तर पायलट यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ आपोआप पडली असती. पण, काँग्रेसला राजस्थानात अपेक्षित यश मिळाले नसल्याने गेहलोत यांचे पारडे जड झाल्याचे काँग्रेसमधील जाणकारांचे म्हणणे आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will soon see chief minister says rahul gandhi
First published on: 13-12-2018 at 11:11 IST