Y S Jagan Mohan Reddy vehicle Accident : वायएसआरसीपी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या वाहनाखाली बुधवारी एक पक्ष कार्यकर्ता कथितपणे चिरडला गेल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय चिली सिंगैया हे जगन मोहन रेड्डी यांच्यावर फुलं उधळण्याचा प्रयत्न करत असताना घसरून गाडीच्या समोर पडले आणि त्यांच्या अंगावरून गाडी गेल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचे पुढचे उजवे चाक त्यांच्या व्यक्तीच्या मानेवरून गेले.

पोलिसांनी काय सांगितलं?

यानंतर पोलीस आणि वायएसआरसीपीचे कार्यकर्ते त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले, आणि त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना गुंटुर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, पण वाटेतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती गुंटूरचे पोलिस अधीक्षक एस सतीश कुमार यांनी दिली.

सुरुवातीला सिंगैया हे जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील एका वहनावर चढताना खाली पडून जखमी झाल्याचे बोलले जात होते. पण ज्या वाहनात जगन मोहन रेड्डी प्रवास करत होते त्याच वाहनाखाली ते चिरडले गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सिंगैया वेंगलायपालेम गावचे रहिवासी होते आणि ते फुले देऊन जगन मोहन रेड्डी यांच्या स्वागत करण्यासाठी गेले होते. पालनाडू जिल्ह्यातील रेंटपल्ला गावाला भेट देऊन जगन मोहन रेड्डी परतत असताना ही घटना घडली. या गावात ते पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले होते.

“सिंगैया दुर्दैवाने ताफ्याच्या समोर पडले आणि चिरडले गेले,” असे एसपी कुमार म्हणाले. याच दिवशी आणखी एक वायएसआरसीपी समर्थक, ३० वर्षीय पी जयवर्धन रेड्डी हा जगन मोहन रेड्डी यांच्या समर्थकांच्या चेंगराचेंगरीत ठार झाला. ही घटना सट्टेनापल्ली क्लॉक टॉवर जवळ घडली. त्याला गुंटूर शासकिय रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

जगन मोहन रेड्डी यांचा दौरा वादात

वायएसआरसीपी समर्थकाने झळकवलेल्या एका वादग्रस्त फलकामुळे जगन मोहन रेड्डी यांचा पालनाडू दौरा आधीच वादग्रस्त ठरला होता. या पोस्टरमुळे पोलीसांनी गुन्हा नोंदवला असून आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वायआरसीपी कार्यकर्ता टी रवितेजा याने बुधवारी हातात धरलेल्या या पोस्टरवर “जेव्हा २०२९ मध्ये वायएसआरसीपी सत्तेत येईल,” असं लिहिलं होतं आणि त्या खाली “रापा रापा नारुकुता” असं म्हटलं होतं. हे तेलगु भाषेतील शब्द अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा २ चित्रपटातील एका डायलॉगचा भाग आहेत आणि याचे भाषांतर “त्यांना एक एक करून कापून टाका” असे होते. दरम्यान पालनाडू येथील पोलिसांनी सांगितले की त्यांनी रवितेजा या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.