आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युआन या चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचे चीनने स्वागत केले आहे. चीन ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असून त्यांनी आर्थिक घसरणीनंतर चलनाचे अवमूल्यन करण्याची शक्यता फेटाळली आहे. युआन चलनास पाचवे राखीव चलन म्हणून ‘स्पेशल ड्राइंग बास्केट’मध्ये स्थान मिळाले आहे.
अमेरिकेचा डॉलर, ब्रिटनचा पाउंड, युरोपीय समुदायाचा युरो, जपानचा येन ही आधीची चार राखीव चलने आहेत. या चलनाला राखीव दर्जा मिळाल्याने आता नाणेनिधीने चीनच्या आर्थिक सुधारणा व इतर कामगिरीवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे. चीनच्या ‘द पीपल्स बँके’ने या निर्णयाचे स्वागत केले आहे. राखीव चलनाचा दर्जा मिळाल्याने जागतिक समुदायाला चीनकडून मोठय़ा आशा आहेत हे स्पष्ट झाले आहे, असे बँकेने म्हटले आहे. चीनच्या युआन या चलनाला काल राखीव चलनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला होता. नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लॅगार्ड यांनी सांगितले, की जागतिक अर्थव्यवस्थेशी चीनच्या अर्थव्यवस्थेची एकात्मता राहण्याच्या दृष्टिकोनातून हे मोठे पाऊल आहे. चीनची अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत असताना नाणेनिधीने हा निर्णय घेतला असून त्यात भारत आर्थिक विकास दरात पुढे गेला असताना चीनने आर्थिक सुधारणांना उत्तेजन देण्याचा हेतू आहे. या निर्णयाचे एचएसबीसी संस्थेनेही स्वागत केले आहे.