Zakir Naik : इस्लामिक धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक हे नाव कोणत्या न कोणत्या कारणांनी कायम चर्चेत असतं. मागील काही दिवसांपासून झाकीर नाईकबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या पोस्टमध्ये झाकीर नाईक एड्सने ग्रस्त असल्याचा दावा केला जात आहे. या चर्चांवर आता झाकीर नाईकच्या वकिलांनी मोठा खुलासा केला आहे.
५९ वर्षीय झाकीर नाईक सध्या मलेशियात राहत असल्याची चर्चा आहे. झाकीर नाईकवर भारतात धार्मिक कट्टरता पसरवण्याचा आरोप आहे. दरम्यान, झाकीर नाईकच्या संदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवर वकिलामार्फत निवेदन देण्यात आलं असून झाकीर नाईक एड्सने ग्रस्त असल्याच्या चर्चा वकिलांनी फेटाळून लावल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं झाकीर नाईकचं म्हणणं आहे. मात्र, अशा प्रकारचे दावे आपल्याला बदनाम करण्यासाठी करण्यात येत असल्याचंही झाकीर नाईकचं म्हणणं आहे. या संदर्भातील वृत्त फ्री मलेशिया टुडेनी दिलं आहे.
झाकीर नाईकच्या वकिलांनी काय म्हटलं?
समोर आलेल्या वृत्तानुसार, झाकीर नाईकने त्याच्या वकिलांमार्फत दिलेल्या निवेदनात त्याला एड्स असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे आणि आपण पूर्णपणे निरोगी असल्याचं म्हटलं आहे. नाईकच्या वकिलांनी म्हटलं की, “झाकीर नाईक हे रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या चर्चा मूर्खपणाच्या आहेत”. दरम्यान, नाईकच्या वकिलांनी अशा प्रकारच्या चर्चा करणाऱ्या व्यक्तींवर झाकीर नाईकची बदनामी केल्याचाही आरोप केला आहे. “संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जात असून तो व्यक्ती मलेशियाचा असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं ते म्हणाले.
झाकीर नाईकच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे दावे बेजबाबदार लोकांकडून पसरवले जात आहेत. पण आता पुढील कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी यातील दोषींची पार्श्वभूमी आम्ही तपासत आहोत. नाईक यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चा घडवल्या जात आहेत. पण हे सर्व दावे खोटे आहेत असं ते म्हणाले.