किव्ह : रशियन फौजांनी युक्रेनमध्ये लढू नये, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी रात्री त्यांच्या दृश्यफीत भाषणातून केले. या युद्धात हजारो रशियन सैनिक मरण पावतील असे त्यांच्या अधिकाऱ्यांनाही वाटत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.

 ‘कुठलीही प्रेरणा नसलेल्या आणि लढाईचा फारसा अनुभव नसलेल्या’ नव्या सैनिकांची रशिया भरती करत आहे, असे झेलेन्स्की म्हणाले. येत्या काही आठवडय़ांत हजारो रशियन सैनिक मरण पावतील व आणखी हजारो जखमी होतील याची रशियन कमांडर्सना पुरेपूर जाणीव आहे, असेही त्यांनी सांगितले.

 ‘रशियन कमांडर्स त्यांच्या सैनिकांशी खोटे बोलत आहेत. लढण्यास नकार दिल्याबद्दल त्यांना गंभीरपणे जबाबदार धरले जाईल असे ते सांगतात. याच वेळी, मृतदेह साठवण्यासाठी रशियन लष्कर अतिरिक्त शीतगृह मालमोटारी तयार करत असल्याचे मात्र ते लपवतात. रशियन सैन्याची नव्याने किती हानी झाली आहे हेही ते सांगत नाहीत’, असे झेलेन्स्की म्हणाले.  ‘प्रत्येक रशियन सैनिक अजूनही त्याचा स्वत:चा जीव वाचवू शकतो. आमच्या भूमीवर नष्ट होण्यापेक्षा रशियात जिवंत राहणे तुमच्यासाठी अधिक योग्य आहे’, असेही झेलेन्स्की यांनी रशियन सैनिकांना उद्देशून सांगितले.