Zepto Delivery Agent Punches Customer Viral Video : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये झेप्टो डिलीव्हरी एजंटने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली आहे. बुधवारी (२१ मे) बसवेश्वरनगरमध्ये ही घटना घडली असून झेप्टोच्या डिलिव्हरी एजंटने एका ग्राहकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा डिलिव्हरी एजंट ग्राहकाला मारहाण करत असताना दोन महिला त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांने, मारहाण व शिवीगाळ चालूच ठेवली होती असे या व्हिडिओत दिसत आहे.
विष्णूवर्धन (३० वर्षे) असे या मारहाण करणाऱ्या झेप्टोच्या डिलिव्हरी एजंटचे नाव आहे. बुधवारी बसवेश्वरनगर येथील शशांक या व्यावसायिकाच्या घरी एक वस्तू पोहोचवण्यासाठी तो गेला होता. मात्र, डिलिव्हरीसाठी देण्यात आलेला पत्ता चुकीचा होता असं म्हणत विष्णूवर्धनने शशांक यांच्या घरातील एका महिलेची वाद घातला. त्यानंतर शशांक यांनी या वादात हस्तक्षेप केला आणि प्रकरण अधिक तापलं.
ग्राहकाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर, सर्जरी करावी लागू शकते
शशांक यांनी सांगितलं की “झेप्टोचा डिलिव्हरी एजंट (विष्णूवर्धन) आमच्या घरातील महिलेची बाचाबाची करत होता. मी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर तो अजून संतापला आणि मला मारहाण करू लागला. माझा चेहरा, डोळे व डोक्याला गंभीर इजा झाली आहे. विष्णूवर्धन याने केलेल्या मारहाणीत माझ्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली आहे. डॉक्टरांनी काही औषधे आणि मलम दिलं आहे. आठवड्याभरात जर इजा बरी झाली नाही तर मला सर्जरी करावी लागू शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे”.
झेप्टोनेही दिली प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणावर झेप्टोने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या डिलिव्हरी एजंटने केलेली चूक कंपनीने स्वीकारली आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की “ग्राहकाला झालेल्या असुविधेबाबत आम्हाला खेद आहे. अशी चूक पुन्हा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.”
आरोपीविरोधात गंभीर गुन्हा दाखल
दुसऱ्या बाजूला पोलिसांनी आरोपी विष्णूवर्धनविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (एखाद्या व्यक्तीला इजा करणे) कलम १२६, कलम ३५१ (धमकी देणे) कलम ३५२ (एखाद्याला अपमानित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आम्ही तपास सुरू केला आहे. तसेच आम्ही सीसीटीव्ही व्हिडिओ देखील तपासत आहोत.