News Flash

खाद्यक्रांती!

काही नतद्रष्ट आणि काँग्रेसवाले आणि इटलीबिटलीतले लोक त्यांच्यावर जळतात.

आमच्या बाबाजींना कोण ओळखत नाही? त्यांना अर्धवस्त्रांकित अवस्थेत लोक ओळखतातच; पण अंगभर सलवार-कुर्त्यांतही ओळखतात!

आमच्या बाबाजींना कोण ओळखत नाही? त्यांना अर्धवस्त्रांकित अवस्थेत लोक ओळखतातच; पण अंगभर सलवार-कुर्त्यांतही ओळखतात! दिल्लीच्या पोलिसांनी तर त्यांना म्हणे बुरख्यातही ओळखले होते!
काही नतद्रष्ट आणि काँग्रेसवाले आणि इटलीबिटलीतले लोक त्यांच्यावर जळतात. (अनेक नेते तर बाकी नाही, पण बाबांच्या पोटावर जळतात!) म्हणतात, की बाबाजींना ही लोकप्रियता योगायोगानेच मिळाली आहे. त्यात योगाचा हात आहे, हे खरेच आहे. पण त्यासाठी बाबाजींनी जी अंगमेहनत घेतली त्याचे काय?
आयुष्यात यशासाठी माणसे किती तडजोडी करतात. विविध प्रकारची गुंतवणूक करतात. बाबाजींनी आपल्या शरीराची गुंतवणूक केली. सुरुवातीच्या काळात म्हणे शरीराची अशी गुंतवणूक करता करता गुंतावळाच व्हायचा! पण आता तसे होत नाही. आता गुंतूनी गुंत्यात सारा देह त्यांचा मोकळाच राहतो. आणि त्याचमुळे त्यांना अनेक उद्योग करण्यासाठी वेळ मिळतो.
वस्तुत: स्वातंत्र्यानंतर आज ६५ वर्षांनीसुद्धा बाबाजींसारख्या निरिच्छ महापुरुषास अशी शेवया वळण्याची वेळ यावी ही गोष्टच लांच्छनास्पद आहे.
मनुष्यप्राण्यास पोटासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, हे मान्यच. पोट माणसाला दाहीदिशा फिरवते, हेही मान्य. पण बाबाजी हे काही सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनी नाहीत. त्यांना पोट फिरवत नाही, तर ते पोटाला फिरवतात!
त्यांच्या त्या पोटाची काळजी राष्ट्राने घ्यायला नको? ते पोट राष्ट्रीय स्मारक म्हणून जपून ठेवायला नको? त्याचा हेरिटेजच्या यादीत समावेश करायला नको? त्याचे पोस्टाचे तिकीट काढायला नको?
पण आपण असे पोटार्थी, की बाबाजींनाच पोटासाठी आपल्या पोटाची काळजी वाहावी लागत आहे. अन्यथा त्यांना बाजारात नव्या शेवया आणण्याची काही आवश्यकता होती का?
हा प्रश्न घेऊनच आम्ही त्यांना भेटलो.
आमच्या सदाभुकेल्या पोटाकडे पाहून बाबाजींनी ‘केवलम् एकम् मिनिटम्’ असे म्हणत शेवयांचे पाकीट फोडले. त्याचा रॅपर जाहिरातीतल्यासारखा हाती धरत म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता तशा या शेवया नव्या नाहीत. खूप प्राचीन आहेत!’’
‘‘म्हणजे?’’ आमच्या तोंडचे पाणीच पळाले. पळणारच! एक्स्पायर्ड शेवयांची चव तितकीशी काही चांगली लागत नाही.
बाबाजी म्हणाले, ‘‘हा आमचा प्राचीन खाद्यपदार्थ आहे. त्याला युगायुगांची परंपरा आहे. आयुर्वेदाचा बाहेरून पाठिंबा आहे. आपले पूर्वज शेवया खायचे, म्हणून तर आपल्या देशाने एवढी प्रगती केली होती.’’
‘‘अच्छा, तसं होय? पण बाबाजी, योगानंतर एकदम हा शेवयांचा बिझनेस म्हणजे..’’
गॅसवरच्या उकळत्या पाण्यात अलगद हाताने शेवया सोडत बाबाजी म्हणाले, ‘‘देखो बालक, हा गलत अपप्रचार आहे. योग आणि शेवया यांत काहीही अंतर नाही. योगाने मनुष्याचं शरीर शेवयांसारखंच वळतं. शेवयांना आयुर्वेदातही फार महत्त्व आहे. आमच्या या शेवया अतिशय खास आहेत. बाकीच्या शेवयांसारख्या नाहीत. मी कोणाचं नाव नाही घेणार; पण त्या शेवया दोन मिनिटांत होतात, आमच्या एक मिनिटात होतात. नासाच्या प्रयोगशाळेत तसं सिद्ध झालं आहे. शिवाय या स्वदेशी आटय़ापासून बनवलेल्या आहेत. त्यामुळे आरोग्यवर्धक आणि पचनालाही हलक्या. सौ टका पोल्युशन-फ्री! आमची सगळीच उत्पादनं तशी असणार आहेत.’’
‘‘म्हणजे तुम्ही आणखीही काही उत्पादनं आणणार आहात?’’
मूर्ख प्रश्न! ऑफकोर्स आणणारच ना! आपल्या स्वदेशी गावांकडं बायका उन्हाळ्यात शेवया बनवायला घेतात. मग त्याबरोबरच कुरडय़ा, पापडय़ा, पापड, खारवडे असे काय काय बनवत बसतात. बाबाजीही बहुधा तसेच करणार असावेत.
ते म्हणाले, ‘‘ते अजून आम्ही जाहीर केलेलं नाही. पण आम्हाला या भारतवर्षांत आयुर्वेदिक खाद्यक्रांती करायची आहे. मोदीजींचं स्वप्न आहे अच्छे दिन आणण्याचं. आम्हाला ते पूर्ण करायचं आहे. लो.. ट्राय करो..’’ आमच्या हाती वाफाळती ताटली ठेवत बाबाजी म्हणाले. शेवयांच्या त्या गंधाने आमच्या पोटातल्या पोटात योगासने सुरू झाली होती. तसाही आम्हांस गेल्या कित्येक महिन्यांचा मॅगीउपास.. आय मीन- मेगाउपास घडला होता.
पण वाफाळत्या शेवया खाणे जिभेस हानीकारक असते, हे अनुभवजन्य ज्ञान आम्हांस होते. तेव्हा चमच्याने तो गुंतवळा उलटापालटा करीत आम्ही बाबाजींना हळूच एक गुगली प्रश्न टाकला, ‘‘अच्छे दिन आणायचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे विदेशातलं काळं धन परत आणायची मागणी करायची, असंच ना?’’
बाबाजी मात्र त्या सवालाने जराही विचलित झाले नाहीत. दाढीतल्या दाढीत हसत ते म्हणाले, ‘‘काला धन हम लायेंगे भी और रोकेंगे भी. त्यासाठीच आम्ही हे संपूर्ण स्वदेशी खाद्यपदार्थ बाजारात आणत आहोत. यानंतर आम्ही स्वदेशी पास्ता आणणार आहोत. त्याचं लायसन्सपण आहे आमच्याकडं.. आणि तुम्ही म्हणता ते अच्छे दिन.. ते पण आम्ही लवकरच आणणार आहोत.’’
‘‘आँ? अच्छे दिन आणणार तुम्ही?’’
आम्हांस आनंदाने भरूनच आले. तसेही अलीकडे आमचे मन जरा अधिकच टॉलरन्ट झाले आहे. ते कशावरही विश्वास ठेवते. उद्या त्या फोरजीबालेने आम्हांस सांगितले ना, की रेल्वेतसुद्धा तुमचा कॉल ड्रॉप होणार नाही, तरी आम्ही तिच्यावर विश्वास ठेवू. हे तर साक्षात् बाबाजी होते.
ते म्हणाले, ‘‘पुढच्याच महिन्यात! त्याच्या टेस्टसुद्धा सुरू झाल्या आहेत.’’
ते ऐकून तोंडातला घास गिळण्याचेही भान आम्हांस राहिले नाही.
‘‘अतिशय स्वस्तात आम्ही ते देणार आहोत. आयुर्वेदिक अच्छे दिन. एक पॅक फक्त पाच रुपये!’’
‘‘पॅक?’’
अच्छे दिनचा पॅक? अरे, अच्छे दिन म्हणजे काय इंटरनेटचा डेटापॅक आहे?
‘‘जी हाँ. पाहायचाय तुम्हाला? ये देखो..’’ असे म्हणत बाबाजींनी आमच्या हातात चक्क बिस्किटांचा पुडा ठेवला! म्हणाले, ‘‘हे अच्छे दिन बिस्कीट! तुमच्या त्या गुड डे बिस्किटांना हे आमचं आयुर्वेदिक उत्तर!’’
तुम्हांस सांगतो, आम्हाला तेव्हा जो ठसका लागला आहे तो अजूनही जात नाहीये. बहुधा तो बाबाजीनिर्मित पतंजली पाणी पिल्याशिवाय जाणार नाही..

अप्पा बळवंत
balwantappa@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2015 12:26 am

Web Title: article on ramdev baba noodles
Next Stories
1 एक प्रश्न!
2 इनटॉलरन्स!
3 शोभायात्रा!
Just Now!
X