‘धारणांचे धागे’ तपासताना गेल्या काही लेखांतून आपण भारतवर्ष, आपला-परका याविषयीचा विवेक, देव आणि असुर या संकल्पनांचे मूळ स्वरूप आणि त्यातून पुढे आलेल्या काही मिथकांच्या आकलनाविषयीचा ढोबळ विवेक अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. दक्षिण आशियातील सामाजिक-सांस्कृतिक विश्वाचा इतिहास तपासताना आपल्याला या प्राथमिक, पण महत्त्वाच्या संकल्पनांविषयीच्या मूळ धारणा समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. भारतीय उपखंडातील सांस्कृतिक-भौगोलिक परीघातील समाजविश्व आणि सांस्कृतिक धारणा वर उल्लेखिलेल्या संकल्पनांच्या पायावर उभ्या राहिल्या, वाढल्या आणि त्यांनी प्रत्येक काळातील सामाजिक घडामोडींना आणि समाजनिर्मितीच्या प्रक्रियेला वेगवेगळे आयाम देण्यात मोठी भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. विशिष्ट भूप्रदेशाविषयीची जाणीव, स्वकीय किंवा परकीय वगरे कल्पनांविषयीच्या बदलत राहिलेल्या धारणा, नैसर्गिक शक्ती, समूहांतील संरक्षक/ लढवय्ये नेते आणि ईश्वरविषयक विचार, इत्यादी संकल्पनांविषयीचे निरनिराळे समज आणि धारणा या बहुपेडी समाजात विविध माध्यमांतून परंपरागतरीत्या हस्तांतरित होत राहिल्या. या अशा रुजवल्या गेलेल्या धारणांच्या बहुस्तरीय पदरांमुळे दक्षिण आशियाई समाजविश्वाची मानसिकता आणि सांस्कृतिक स्वरूपांना आयाम मिळत गेले. त्यातून निर्माण झालेल्या सामूहिक मानसिकता आणि समाजातील स्थित्यंतरे यांच्या गतिमानतेतून समाजनिर्मितीच्या प्रक्रियेतील योग्य-अयोग्यतेविषयीच्या, समाजव्यवस्थेविषयीच्या आणि अन्य सामाजिक-सांस्कृतिक संस्थांच्या चौकटी आखल्या गेल्या. यातूनच आकाराला आली ती ‘धर्म’ नावाची महाकाय, जटिल अशी संस्था.

‘धर्म’ हा शब्द सामाजिक धारणांचे प्रतिनिधित्व करतो. (धारणाद्धर्म इत्याहु:।) अशी उत्तरकालीन संस्कृत साहित्यात मांडणी केली गेली असली तरीही या कल्पनेचे मूळ अर्थ आणि आयाम आपल्याला या व पुढील लेखांतून पाहायचे आहेत. आजवरच्या आपण चर्चा केलेल्या अन्य विषयांच्या तुलनेत या विषयाची व्याप्ती महाकाय अशीच आहे. ही कल्पना मुळातच गुंतागुंतीची आणि कमालीची परिवर्तनशील असल्याने तिच्याविषयीच्या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या धारणा, त्या धारणांतून उभ्या राहिलेल्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञान प्रणाली, समाजशास्त्रीय व्यवस्था, पर्यायाने जातिसंस्था आणि अर्थातच श्रद्धाविश्वातील बहुस्तरीय चौकटी यांविषयी आपल्याला पुढच्या लेखांतून चर्चा करायची आहे. याआधीच्या लेखांप्रमाणेच आपल्याला या साऱ्याचा अभ्यास आजच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरांच्या पृष्ठभूमीवर करायचा आहे. आणि म्हणूनच या विषयांच्या ऐतिहासिक विकसनाकडे पाहताना आपण आजच्या संदर्भातील अर्थ आणि धारणांना या ऐतिहासिक स्थित्यंतरांच्या टप्प्यांशी ताडून पाहणार आहोत.

‘धर्म’ या शब्दाच्या वेदकालापासूनच्या अर्थविकसनाची प्रक्रिया पाहिली असता दोन परस्पर विसंगत गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. त्या अशा की, ‘धर्म’ या शब्दाद्वारे  ध्वनित होणाऱ्या कल्पनेमध्ये समाजधारणा व नियमनविषयक चौकटी अभिप्रेत असून ही कल्पना येथील बहुस्तरीय श्रद्धाविश्वाच्या चौकटीपासून बऱ्याच अंशी स्वतंत्र अस्तित्व राखून होती. तर काही ठिकाणी त्याचा अर्थ काहीसा संकुचित होऊन ही संज्ञा मित्र-वरुण (व पुढे अन्य) इत्यादी देवतांशी निबद्ध असल्याचे दिसून येते. उत्तरवैदिक काळातील बौद्ध, जैन, इत्यादी परंपरांतून त्याला आणखी निराळेच आयाम मिळाल्याचे दिसून येते. तर त्याच्याही पुढील गुप्त-शुंग काळात धर्म- संकल्पना अधिक साचेबद्ध स्वरूपात आकार घेऊ पाहते. मध्ययुगातील धर्म या संकल्पनेचे रूप तत्कालीन सरंजामशाही, छोटय़ा राज्यसमूहातील सांस्कृतिक धारणा आणि मध्य आशियाई  प्रदेशांतून होणाऱ्या आक्रमणांतून आणखी निराळ्या स्वरूपात अभिव्यक्त होते.

ऋग्वेदामध्ये ‘धर्म’ हा शब्द साधारणत: ६५-६७ वेळा, यजुर्वेदामध्ये २२ वेळा, तर अथर्ववेदामध्ये १३ वेळा दिसून येतो. सामवेद हा ऋग्वेदातीलच ७०० ऋचांचा समुच्चय असल्याने त्याचा वेगळा विचार यासंदर्भात करण्याची आवश्यकता नाही. ऋग्वेदातील बरेचसे मंत्रदेखील यजुर्वेदामध्ये पुनरुक्त होताना दिसतात. यजुर्वेदाच्या चारही उपलब्ध संहितांमधून (मत्रायणी, काठक, तत्तिरीय आणि वाजसनेयी) येणारा हा शब्द एकाच विशिष्ट संदर्भात वापरला गेल्याचे दिसून येते.  बहुतांश शब्द वर उल्लेख केल्याप्रमाणे मत्रावरुण (मित्र आणि वरुण) या देवताद्वंद्वाच्या संदर्भात वापरले गेले आहेत. (ध्रुवेण धर्मणा- अर्थात् दृढ अशा धर्माने/धर्माद्वारे) हा वाक्प्रचार यासंदर्भात वारंवार आल्याचे दिसून येते. कर्मकांडात्मक वैदिक धर्मातील विधींमध्ये यज्ञीय स्तंभ (यूप) रोवताना (ज्याला धर्मस्तंभाचे प्रतीक मानले जात असे. याविषयी आपण पुढे चर्चा करणार आहोतच.) त्याला उद्देशून ‘द्युतानस्त्वा मारुतो मिनोतु मित्रावरुणयोध्र्रुवेण धम्रेण।’ अर्थात, द्युतान मारुत (मरुत् हा वायुतत्त्वात्मक देवतागण तुला मित्रवरुण यांच्या चिरस्थायी, दृढमूल अशा धर्माप्रमाणे दृढ स्थापित करो.) हा किंवा अशा अर्थाचे अन्य मंत्र आपल्याला दिसून येतात. यजुर्वेदात पुनरुक्त होत असलेल्या अशा अर्थाचे ऋग्वेदीय मंत्र हे वरुण या विश्वनियमन करणाऱ्या देवतेद्वारे संचालित होत असलेल्या विशिष्ट उपासना पद्धती आणि श्रद्धाव्यवस्थेला अधोरेखित करतात. मत्रायणी संहितेमध्ये (३.८.९) म्हटल्यानुसार, ‘मित्र आणि वरुण हे मुख्यत: धर्मधारणेचे कार्य करतात. यापैकी मित्र ही देवता धर्माला दृढतेने धरून ठेवते, तर वरुण त्या धरून ठेवलेल्या धर्मव्यवस्थेला दृढ रोवून तिला सुस्थापित करतो. विश्वातील जीवांच्या अस्तित्वासाठीच या धर्माची स्थापना होते. सर्व देवतांमध्ये केवळ मित्रावरुण हेच धर्माची स्थापना करतात. तेच दैवी विश्वनियमांचे नियमन करतात.’ येथे धर्म हा शब्द ‘धृ’ अर्थात धारण करणे, सुस्थापित करणे, आधार देणे  या अर्थाने वापरला गेला आहे याची कल्पना परिच्छेद वाचताना सहजगत्या येते.

वरुण ही देवता वैश्विक नियमांचे नियमन करत असल्याची नोंद वेदांमध्ये वारंवार दिसून येते. मानवी समाजातील नियमन व्यवस्था असलेला धर्म हा या वैश्विक नियमांशी घट्ट संबंध ठेवून असल्याची वैदिक ऋषींची धारणा होती. या वैश्विक नियमांनाच ऋषींनी ‘ऋत’ असे संबोधले आहे. त्यामुळेच ‘धर्म’ या शब्दाचा मागोवा घेताना आपल्याला ‘ऋत’ या ऋग्वेदीय संकल्पनेचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. ‘ऋत’ ही ऋग्वेदातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून, प्राचीन भारतीय तत्त्वप्रणालींतील अनेक प्रमुख संकल्पना ‘ऋत’ या तत्त्वावर बेतलेल्या असल्याचे दिसून येते. हा शब्द ‘ऋ’ या गतिवाचक धातूपासून बनला आहे. वैश्विक व्यवस्थेचे, सृष्टीतील पर्यावरणीय गतिमानतेचे संचालन व संतुलन आणि सत्याधारित नैतिक मार्गाचे नियमन करणारे तत्त्व म्हणजे ‘ऋत’! सृष्टीला संजीवक ठरणाऱ्या सूर्य-चन्द्रादि ग्रहगोलांची गती, दिवस-रात्र यांची नियमितता, अरुणिमा घेऊन रोज क्षितिजावर अवतरणारी उषस् ही देवता, ठरल्याप्रमाणे विशिष्ट कालगतीनुसार चालणारे दक्षिण आशियाई ऋतुचक्र, वनस्पती व अन्य सजीवांच्या शारीरिक विकसनाची ठरावीक पद्धत अशा अनेक घटकांनी युक्त असलेली विश्वातील नियमबद्ध, संतुलित सुसूत्रता इत्यादी तत्त्वे ‘ऋत’ या संकल्पनेत अंतर्भूत होतात. थोडक्यात, संपूर्ण सृष्टिक्रमच या ‘ऋत’निबद्ध नियमांनी बांधला गेला आहे अशी वैदिक ऋषींची धारणा असल्याचे दिसून येते. वरुणासाठीचे ‘ऋतस्य गोपा’ असलेले विशेषण वरुणाचे ऋत तत्त्वाशी असलेले जवळचे नाते स्पष्ट करते. ‘ऊरुचक्षस्’ (दीर्घदृष्टी असलेला/ जगाचा नियंता म्हणून सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा) असलेल्या या वरुणाप्रमाणेच सोम, अग्नी, सूर्य इत्यादी देवतांनादेखील ऋग्वेदात ‘ऋत-पालक’ या अर्थाची विशेषणे योजिलेली दिसतात. विश्वाचे संचालन हे या ‘ऋत-निबद्ध’ नियमांनीच होत असल्याने वैदिक देवता स्वत:देखील त्याचे पालन करतात व त्यामुळे मानवांनादेखील ‘ऋत’ नियमांचे पालन करण्यास प्रेरणा मिळते अशी वैदिक ऋषींची निश्चित धारणा होती. मात्र, म्हटल्याप्रमाणे वरुण ही देवता ‘ऋत’ या संकल्पनेशी जोडलेली मुख्य अधिष्ठात्री देवता असली तरी ‘ऋत’ तत्त्वाच्या निर्मितीचे कर्तृत्व वरुण किंवा अन्य कुणाही देवतेकडे दिले गेल्याचे दिसत नाही.

विख्यात संस्कृत तज्ज्ञ आर्थर मॅक्डोनेल यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘ऋत ही संकल्पना वैदिक समाजाची/ ऋषिमंडलाच्या चिंतनविश्वाची सर्वोच्च अशी अभिव्यक्ती’ आहे. विश्व-संचालनाचे व नियमनाचे हे आदिम, शाश्वत तत्त्व असलेली ‘ऋत’ ही संकल्पना ऋग्वेद-काळात भौतिक सृष्टीतील शाश्वत नियमांपुरती सीमित असली तरी पुढील काळात विकसित झालेल्या ‘धर्म’ व ‘कर्म’ या संकल्पनांमागील मूळ कल्पना असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र, कालौघात ‘ऋत’ या कल्पनेशी निबद्ध असलेले वैश्विक नियम, शाश्वत नियम-व्यवस्था हे आदिम, मूळ अर्थ मागे पडून त्याविषयीच्या धारणादेखील बदलल्या. कर्मकांडांच्या प्रभावासोबत ‘ऋत’तत्त्वाचे यज्ञपर अर्थ लावण्यात आले, तर पुढे औपनिषदिक परंपरांच्या प्रभावकाळात ‘ऋत’तत्त्वावर ब्रह्म या संकल्पनेचा अध्यारोप झाला. ‘निरुक्त’ या व्युत्पत्तिशास्त्रपर आद्यग्रंथात यास्काचार्यानी ‘ऋत’ शब्दाच्या यज्ञपर अर्थावर अधिक भर दिल्यामुळे ‘ऋत’ शब्दाला वैदिक ऋषींनी दिलेली व्यापक परिमाणे संकुचित झाली. त्यातून ही महान, उदात्त कल्पना एका विशिष्ट कर्मप्रणालीपुरती सीमित होऊन राहिली. अर्थात वेगवेगळ्या काळात अर्थच्छटा बदलत गेल्या असल्या तरीही ‘ऋत’ शब्दाचे नियमनपर अर्थ वेगळ्या पद्धतीने डोकावत राहिले. अर्थात, ‘ऋत’ या शब्दातून प्रतीत होणारे सत्य, विवेकपर अर्थच्छटा आपल्याला ऋग्वेदातच दिसून येतात. पुढे विश्वाचे संचालन, वैश्विक नियम व सृष्टिक्रम यांचा मानवी जीवनातील घटनांशी संबंध जोडला गेला. धर्म-नीतिपर वर्तनासाठी वापरली गेलेली ‘ऋत’ ही कल्पना मानवी व्यवहारातील युक्तायुक्त विवेकाशी जोडली गेली. वैश्विक चतन्याशी व सृष्टिक्रमाशी असलेल्या निबद्धतेतून पुढे धर्म, कर्तव्य, कर्म-कर्मफल, इत्यादी कल्पना पुढील काळात विस्तार पावल्या व धर्मव्यवस्थेला पुढील काळात नवे नीतिमूल्याधिष्ठित आयाम मिळाले असे दिसून येते. तरीही वर म्हटल्याप्रमाणे ‘ऋत’ या विशाल, उदात्त संकल्पनेची व्याप्ती यज्ञव्यवस्थेपुरतीच मर्यादित राहिल्याने या संकल्पनेचा व पर्यायाने धर्म या संकल्पनेचा अर्थदेखील संकुचन पावला. आणि त्याचे पुढील तत्त्वज्ञानात्मक परंपरा आणि सामाजिक संरचनेवर दूरगामी परिणाम झाले.

पुढील भागांमध्ये ‘धर्म’ या संकल्पनेचे विविध अर्थ व त्यांच्या बदलत्या अर्थच्छटा पाहताना आपल्याला काळाच्या एका विशाल पटाचा विचार करायचा आहे. हा विचार करताना आपण वैश्विक नियम आणि नैतिकतेशी संबद्ध असलेल्या ‘ऋत’ या कल्पनेविषयी आणखी किंचित चर्चा करून पुढे यज्ञव्यवस्थेशी निगडित राजकारण, अर्थकारण व संस्कृतिकारण लक्षात घेणार आहोत. त्या अनुषंगाने आकाराला येणाऱ्या समाजव्यवस्थेतील विविध हितसंबंधांतून उभ्या राहणाऱ्या चौकटी आणि त्यांचे नियमन करणारे एजंट्स व स्वघोषित संरक्षक कसे निर्माण होतात याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे. हा आढावा घेताना अर्थातच प्रतिक्रियात्मक सामाजिक, धार्मिक आणि तत्त्वज्ञानात्मक चळवळी व व्यवस्था, त्यांचे राजकारण व त्याविषयीच्या बदलत जाणाऱ्या धारणादेखील अर्थात चच्रेच्या परिघात येतील. उत्तराधुनिकतेला ओलांडून नव्या काळात प्रवेश करताना पुन्हा नव्याने खुणावणाऱ्या आणि आक्रमक होत चाललेल्या धर्मविषयक अस्मितांच्या अभ्यासासाठी आपल्याला या मूळ संकल्पनांचा विचार करणे का अगत्याचे आहे, हे या व पुढील भागांतील चच्रेतून आपल्या ध्यानात येईलच.

– हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com