आपली ही पोटाची पोकळी आहे ना, ती अजब आहे. त्यातले लिव्हर ऊर्फ यकृत रात्रंदिवस काम करते. पण कसली तक्रार नाही. मला ओव्हरटाइम वाढवून द्या.. छे.. छे! ती भाषाच नाही. त्याला आजार झाला तरी कुरकुर नाही. आरडाओरडा नाही. घर डोक्यावर घेणे नाही. सगळे शांतपणे सहन करणार. तसेच पँक्रिआस ऊर्फ स्वादुपिंड. आणि तशीच किडनी म्हणजे किडन्याही. यांचे सात-अष्टमांश भाग रोगाने खलास होईपर्यंत त्या आपल्याला कळूच देत नाहीत. कुरकुर नाही. मग एकदम आणीबाणीच. हातात फारसे राहिलेले नसते तेव्हा काही.

यातले लिव्हर लोकांमध्ये प्रसिद्ध. (बिचाऱ्याला ‘यकृत’ कोणीच म्हणत नाही.) कारण त्याने कावीळ, आपल्या दारूडय़ा बंधूंचा आजार, लिव्हर सिऱ्होसिस, शिवाय हिपॅटायटिसच्या साथी. मृत्यूही. तसंच किडनीचंही. मुतखडे झाले की बोंबाबोंब. शिवाय डायलिसिस करणे.. त्याची यंत्रे.. इत्यादी. आपण रोज अनेकदा लघवी करतोच. सगळेच. त्यात काय विशेष? ज्याला होत नसेल त्याने पळावे डॉक्टरकडे.

पण या सगळ्यात पँक्री (पँक्रिआसचे हे सुटसुटीत नाव ठेवूयात.) कसं दुर्लक्षित राहिलं? तिथं इन्शुलिन तयार होत असूनही! इन्शुलिन कमी झालं? डायबेटिसचा शिक्का. गोळ्या घ्या. त्वचेखाली रोज दोनदा इंजेक्शन. इन्शुलिनचा जप होतो; पण त्याचा निर्माता अंधारात.

डोकं दुखतं? घरच्या घरी गोळी तोंडात टाका. दात दुखला? डेंटिस्टकडे पळा. पाय दुखले? शेका. पण हे पोटातले महात्मे हु की चू करत नाहीत. त्यातही लिव्हर, किडनीपेक्षा पँक्रिआस एकदम आध्यात्मिक उंचीवरच.

पण त्याला काही झालं तर..? खैर नाही. त्याचा ‘पँक्रियाटायटिस’ हा आजार म्हणजे वेदनेचा डोंबच. माझे गुरू धोंडेसर- त्यांच्या मुलाला.. जयंतला हा आजार झाला. आम्ही आयसीयूच्या बाहेर संगमरवरी, गार पडलेल्या फरशीवर रात्री बसून राहायचो. शेवटी दहा दिवसांनंतर गेलाच तो. तरुण पोरगा. दुसरा माझा मित्र. त्याला याचे अटॅक येतात. आले की वेदना महोत्सव. परत आयसीयू. त्याला आता उतार पडला आहे. पण पँक्रिआस महाराज कधी उसळतील, सांगता येत नाही.

असेल तर एकदम शांत. पण बिघडले की घर डोक्यावर. बऱ्याचदा उद्ध्वस्त. पण तरी या ‘पँक्री’वर रागावू नका. फार क्वचित हा चिडतो. दारूडय़ा मित्रांनी दारू पिऊन याला त्रास दिला तर तो चिडणार नाही तर काय?

रात्रंदिवस बिनबोभाट काम करणारा हा अवयव. किती महत्त्वाच्या अवयवांना खेटून बसलाय हा. जठरानंतर लहान आतडे सुरू होते. ते एका छोटय़ा ‘लूप’चा- म्हणजे अर्धवर्तुळाचा आकार घेते, त्याला म्हणतात- डिओडिनम्. (मघाशी पॅन्क्रिआसला आपण ‘पँक्री’ म्हणू लागलो. याला ‘डिओ’ म्हणूयात.) तर पँक्रीचं डोकं डिओमध्ये विसावलेलं. पुढे जठर. बाजूला लिव्हर. पाठीमागे किडन्या. शेपूट स्प्लीनवर. बोला आता. याला काही झालं तर हा या जवळच्या शेजाऱ्यांनाच त्रास देणार. म्हणून पँक्रीवर जरा लक्ष ठेवू या. त्यामुळे तो खूश राहील. पँक्री दिसतो कसा? तर आडव्या ठेवलेल्या मधाच्या पोळ्यासारखा. सर्वागावर बाजरीच्या दाण्याएवढे उंचवटे. हे पँक्रीचे रूपडे.

इन्शुलिन जरा बाजूला ठेवू. पँक्री एक महत्त्वाचं काम करतो, ते म्हणजे पाचकरस तयार करण्याचं. तुम्ही म्हणाल, हात्तीच्या.. एवढंच होय? पण ऐका तरी. लाळेत साखर म्हणजे काबरेहायड्रेट मिसळायला सुरुवात. पुढे अन्न जठरात. तिथं अ‍ॅसिडमध्ये घुसळण. हे अ‍ॅसिड सौम्य नसते हा. त्याचा थेंब जर त्वचेवर ठेवला तर भोक पडेल इतकं जहाल. पण जठराच्या भिंतींना ते कसं खलास करीत नाही? जर जठराच्या स्नायूंना भोक पडले आणि ते पोटाच्या पोकळीत पसरले तर..? उत्पातच. पण तसं होत नाही. कारण आतून म्यूकस नावाच्या लाळसदृश पदार्थाचा घट्ट थर बसलेला असतो. तर- जठर पेप्सिन तयार करते. आणि प्रोटिनची पडझड सुरू करते. तोंडात अन्न आले की लाळ स्रवते. की खाली पोटाला सिग्नल जातो. तिथं अ‍ॅसिड, पेप्सिन.. की तिथून डिओला सिग्नल. तिथून पँक्रीला संदेश. कदाचित पँक्रीला डायरेक्ट सिग्नल असेल.

पँक्रीमध्ये पाचकरस (ट्रिप्सीन, लायपेज वगैरे) सुप्तरूपात तयार ठेवलेले असतात. जसा भजीवाला कांदा चिरून पिठात घालून ठेवतो. ते मिश्रण म्हणजे भजी नव्हे. पण गिऱ्हाईक आल्यावर त्या पिठाचे मुटके करून तो तेलात सोडतो. मग तो अहाहा वास.. खाताना कुर्रम् आवाज, वगैरे. जाऊ द्या. फार आठवण काढणे नको. पोटातले रस आत्ताच स्रवायला लागायचे. डिओकडून सिग्नल येतो. हे सिग्नल म्हणजे एखादे एन्झाईम- रसायन स्रवते. की पँक्रीची भट्टी सुरू! तिकडे पचन संपले की परत रसायने स्रवणार. थांबा. आणखी भजी तळू नका. गिऱ्हाईक संपलंय. टपरी बंद करायची वेळ झालीय.. असे काही. मग पँक्री स्टो विझवतो.

लाळ, जठरातलं पेप्सीन हे एकेकाच घटकाच्या पचनाला मदत करते. पण पँक्रीमध्ये सर्व घटकांच्या पाचकरसांची व्यवस्था. फॅटसाठी लायपेज, अमायलेज, प्रोटिनसाठी ट्रिप्सीन, इत्यादी. हे रस इतके जालीम, की हा-हा म्हणता अवघड, अडनिडय़ा अन्नाचे साध्या-सोप्या रसायनांमध्ये रूपांतर करतात. प्रोटिन म्हणजे अमायनो अ‍ॅसिडची माळ. ही माळ तोडून सगळ्यांची अमायनो अ‍ॅसिड करणार. की त्यांना आधी अभेद्य वाटणाऱ्या आतडय़ाच्या भिंतीतून रक्तात सहज प्रवेश. तसेच फॅट ऊर्फ चरबीचे आणि शुगरचे. सगळे चालले लिव्हर मावशीकडे. मग ती यांना न्हाऊ-माखू घालणार. कपडे चढवणार. आणि शरीरातून कुठून स्कूल-बस आली की बसवून देणार.

पँक्रीचे पाचकरस उत्तम असले तरी त्यांना जपावे लागते. राक्षसासारखे आहेत ते. काही खायला मिळाले नाही तर..? जाऊ दे. पण आमच्या पँक्रीचे पाचकरस त्याहून पुढे. ते पाचकरस जास्त झाले, किंवा त्या पाइपांना गळती लागली, पाइप ब्लॉक झाला, किंवा मोडतोड झाली, की पाचकरस थेट बाहेर. ते पँक्रीच्या पेशींना खाऊन टाकतं. स्वत:च्या आईला खाणारं हे अजब लेकरू. एवढंच नाही, मागच्या लिव्हरला, शेपटीकडच्या स्प्लीन ऊर्फ पाणथरीलाच खाऊ लागतं. बोला.. काय म्हणायचं याला? असेल तर सूत, नाहीतर भूत.

पण पँक्रीला दोष देऊ नका साहेब. असं फार फार क्वचित होतं. आपण इतकी हजारो, लाखो, कोटी माणसं. बिनबोभाट जगतो आहोतच ना! रोज अन्न खातो. रोज त्याचे पचन होतेच की. शरीर असे विलक्षण, की तिथे कशाचेही रूपांतर कशातही होऊ शकते. माणसाचे माकड, तर किडय़ाचा डायनॉसॉर. प्रोटिनची साखर करते. साखरेची चरबी. चरबीची साखर. साखरेचं प्रोटिन.. म्हणाल ते. काही सांगा- हातखंडा प्रयोग. म्हणून किती बरं आहे! नाहीतर एखाद्या अवयवाकडून साखरेची मागणी आली असती तर माणसाला लगेच साखर मिळवून द्यावी लागली असती. तितक्यात दुसरा अवयव ओरडला असता- आयो, मला प्रोटिन दे ना.. लग्गेच. की मग प्रोटिन शोधा. बापरे! प्रोटिन, चरबी, साखरेच्या पिशव्याच बांधाव्या लागल्या असत्या अंगाभोवती. इतर कामं करायला वेळच उरला नसता. शरीर- त्यातही लिव्हरचे आभार मानावे तितके थोडे.

* * *

आता पँक्रीच्या दुसऱ्या भागाकडे कूच करू. पण त्याआधी गुरूंची ओळख? वा! ती व्हायलाच हवी. त्यांनी या अडाण्याला किती सहजपणे ज्ञान दिले. पहिली म्हणजे डॉ. मंजिरी फणसळकर. माझी मानसकन्या. पाँडिचरीला पॅथॉलॉजी शिकवते. ती वनस्पतीशास्त्रातल्या बापू ऊर्फ श्री. द. महाजनांची मुलगी. शिकवण्याचे गुण वडलांकडून आणि आईकडून. कारण तीही शिक्षिका. दुसरा गुरू म्हणजे डॉ. प्रमोद पाटील. हाही माझा मानसपुत्र. आता नाते बदललंय. आता गुरू-शिष्य. गुरूला नाद माळढोक पक्षी वाचवण्याचा. एखाद्या गोष्टीसाठी माणूस जिवाचे रान करतो असं आपण म्हणतो, ते प्रमोदकडं पाहिलं की पटतं. वेळ काढून तो जैसलमेरला जातो. तिथले माळढोक, त्यांची वसतिस्थानं कशी वाचवता येतील, ते अंडी कधी घालतील, वगैरेचा याला ध्यास. हा उत्तम शिक्षक. याशिवाय माझा सर्जन मित्र डॉ. विलास बापट आणि त्याची पत्नी अलका. हे माझे रेडी रेकनर. लिहिता लिहिता शंका आली आणि या दोघांतल्या कुणाला फोन करावा.. उत्तर तयार! तेही साध्या-सोप्या शब्दांत.

पँक्री या अवयवाचा माहीत असलेला विशेष म्हणजे इन्शुलिन स्त्रवणारी ग्रंथी. या ग्रंथीही दोन प्रकारच्या. एक- एन्डोक्राइन, दुसरी- एक्झोक्राइन. पाचकरस तयार होतात, ते वाहून नेले जातात एका नळीमार्फत. म्हणून पँक्रीला ‘एक्झोक्राइन’ म्हणू या. पण या ग्रंथीतील रसायन- म्हणजे हार्मोन डायरेक्ट रक्तातच जाते. नळीबिळी भानगड नसते. सायबांशी थेट वशिला. हॉटलाइन. थायरॉइड, पिटय़ुटरी, अँड्रेनल.. या साऱ्या एन्डोक्राइन ग्रंथी. खूप महत्त्वाच्या. त्यांना काही झालं तर स्पेशल डॉक्टर लागतो. त्यात गुरू, आपली पँक्री. तिच्यात दोन्ही. एकासाठी टय़ूब, दुसऱ्यासाठी डायरेक्ट रक्तच. पँक्री जठर, लिव्हर, स्प्लीनमध्ये पॅक बसलेला जाड पोळीसारखा अवयव. डिओच्या बाजूला जाड, स्प्लीनच्या बाजूला पातळ होत गेलेला. सगळ्या अवयवावर मधून मधून गोल, बोराच्या आकाराचे फुगलेले भाग. त्या एकेका ग्रंथीतून त्यातून पाचकरस स्रवणार. तर सर्व अवयवाच्या मधे मधे सूक्ष्मदर्शकातून दिसणारे पेशींचे पुंजके. यातून इन्शुलिन व इतर हार्मोन्स स्रवणार.

या पुंजक्यांना बेटं म्हणतात. ज्याने ही बेटं शोधली तो लँगरहॅन नावाचा संशोधक. त्याचं नाव या पुंजक्यांना मिळालंय.. ‘आयलेट्स ऑफ लँगरहॅन.’इतकं छान स्मारक दुसरं माझ्या पाहण्यात नाही. खूप पुतळे पाहतो- पक्ष्यांच्या विष्ठेने भरलेले. किती स्टेशनांना, विद्यापीठांना नाव द्या; त्याचे शॉर्ट फॉर्मच प्रचलित होतात आणि मूळ व्यक्ती विसरली जाते. इथे शिकणारा विद्यार्थी ते या क्षेत्रातला व्यावसायिक ते शास्त्रज्ञ- याचे नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

तर या बेटांमध्ये दोन प्रकारच्या पेशी. अल्फा आणि बीटा. एक इन्शुलिन तयार करणाऱ्या.. आणि हे काय, पँक्रीमध्ये दुसरेही रसायन तयार होते? हो- हो. तेही खूप महत्त्वाचं. त्याचं नाव- ग्लूकॅगॉन. आधी याचं काम सांगतो, आणि मग इन्शुलिन. जेव्हा शरीरात साखर कमी असते, तेव्हा पेशी साखरेसाठी काव-काव करू लागतात. तो संदेश पँक्रीतल्या अल्फा पेशींना जातो. त्या ग्लूकॅगॉन स्रवू लागतात. हे हार्मोन काय करतं? तर लिव्हरला आग्रह करू लागतं- साखरेचे साठे बाहेर काढा. लिव्हरने साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ते साठवलेले असते. कमी जागेत जास्त माल. त्या लिव्हर पेशींवर असतात- ग्लूकॅगॉनसाठी स्वीकार केंद्रे. म्हणजे चावीच म्हणा ना. साठय़ांची कुलपे उघडली जातात. लिव्हरने रूपांतर करून दिलेली साखरेची पोती धडाधड रक्तामध्ये. अगदी ‘झाला महार पंढरीनाथ’मधल्या दामाजी पंतासारखी.

साखर रक्तात पुरेशी आली की वर ग्लुकॅगॉनची निर्मिती बंद.

या सगळ्यातून शरीरावर आलेले एक अरिष्ट टळलेले असते, मावशी. कधी कधी उपाशी राहिल्याने चक्कर येते ना? ती हीच. काय रे भाच्या, सांग तरी. सांगतो सांगतो. शरीरातली साखर कमी होते तेव्हा शरीर हळूहळू ‘हायपोग्लायसेमिया’ अवस्थेत जायला लागतं. अन्नाची वखवख वाढते. घाम येतो. चक्कर येते. बी. पी. खाली जाते. पुढे काही केलं नाही तर.. पेशंट सीरियस. म्हणून जसं इन्शुलिन महत्त्वाचं, तसं ग्लुकॅगॉनही. दोघेही पूरक. पण लोकांच्या तोंडी असतं- इन्शुलिन. डायबेटिस म्हणजे इन्शुलिन आणि इन्शुलिन म्हणजे डायबेटिस. पण सगळ्यांना डायबेटिस नसतो. असेल शंभरातल्या दोघा-चौघांना. पण त्यामुळे गवगवा इन्शुलिनचा.

जसं इतर एंडोक्राइन काम करतात, तसंच इन्शुलिनचंही शरीरानं ठरवून दिलेलं काम आहे. ते पँक्रीचं काम अव्याहत चालू असतं. साखर पेशींना पोहोचवायचं, हे शरीराचं मोठं काम. कारण प्रत्येक पेशीला शुगर लागतेच. शुगर ही ऊर्जा आहे. गाडीचं जसं पेट्रोल. शुगर नसेल तर पेशी कामच करू शकणार नाहीत. अधिक काळाच्या तिच्या विरहाने प्राणही सोडतात. इतकं घट्ट नातं. अहो साहेब, साखर खातो, ती आतडय़ातून लिव्हरला, तिथून शरीरात जाते. यात इन्शुलिनचा काय संबंध?

सांगतो सांगतो. प्रत्येक पेशीवर इन्शुलिनसाठी रिसेप्टर असतो. म्हणजे स्वीकार केंद्र म्हणा. थोडक्यात, कुलूप-किल्लीचं नातं. रक्तातून साखर पेशीपर्यंत पोहोचली, तरी तिला प्रवेश बंद. अहो, आमचं पेशीमध्ये र्अजट काम आहे, जाऊ द्या ना. नो म्हणजे नो. इन्शुलिन सायबाची चिठ्ठी हाय का? तर एन्ट्री. इकडं इन्शुलिन साहेब रिसेप्टरला चिकटले की पेशीच्या आत एक अ‍ॅक्शनची साखळी तयार होते. पेशीमध्ये ग्लूट नावाचे नळीसारखे तुकडे पडलेले असतात. ती अ‍ॅक्शन त्यांच्यापर्यंत पोहोचली की ते खडबडून जागे होतात. उठून अटेंशनमध्ये उभे राहतात. आणि ते जाऊन पेशीच्या आवरणाला आतून चिकटतात. ग्लूट आल्याचे पाहताच शुगरला दारे खडाखड उघडली जातात. शुगर ऊर्फ ग्लूकोज कण उडय़ा मारत आत शिरतात. पेशी तृप्त होते. समझे बाबू, इन्शुलिन क्या करता है? जेव्हा पेशीला पुरेशी साखर मिळते तेव्हा परत रासायनिक निरोपानिरोपी किंवा आज्ञावली. इन्शुलिन रिसेप्टरवरून निघणार. की परत शुगरला पेशीचा रस्ता बंद. जास्त साखर वाईट. कमीही वाईटच. म्हणून शरीराने हे शिपाई मधे ठेवलेले.

निसर्गामधल्या या सूक्ष्मता पाहताना मन थक्क होते. एकपेशीय प्राण्यापासून उत्क्रांत होत आताचा माणूस तयार झाला. डी. एन. ए.ची कॉपी काढताना चुका झाल्या. त्यातल्या काही चुका पथ्यावर पडल्या आणि त्या रूढ झाल्या. आता इन्शुलिन, ग्लुकॅगॉन, ग्लूट ही अजब दुनिया कशी तयार झाली असेल याचे राहून राहून आश्चर्य वाटते. इन्शुलिन आहे ते किती बरे म्हणेपर्यंत ग्लुकॅगॉन पुढे येतो. कोण अधिक ग्रेट म्हणायची सोय नाही. ते तर हातात हात घालून चाललेले. ही इन्शुलिन-ग्लूकॅगॉनची जोडगोळी आपले शरीर नॉर्मल ठेवते. पेशींना ग्लूकोजचे- म्हणजे साखरेचे इंधन कधी कमी पडू देत नाही. त्यांना त्यांचे काम अविरतपणे करता येते.

यात बिघाड होतो.. कधी? कसा? असा बिघाड म्हणजे डायबेटिस. इन्शुलिनच्या कमतरतेचा आजार. कशामुळे निर्माण होते ही कमतरता? हा पूर्वापार चालत आलेला. एच. आय. व्ही.सारखा अलीकडचा नाही. या आजारावरच्या आंतरराष्ट्रीय लेखांच्या सुरुवातीला एक उल्लेख यायचा. आयुर्वेदातल्या महर्षी असलेल्या सुश्रुताने हा आजार प्रथम नोंदवला. त्याला ‘मधुमेह’ असं नाव दिलं. त्या इंग्लिश पुस्तकात रोमन टाइपात ‘मधुमेह’ असं छापलेलं. वा! वा! आजार शोधला कसा? त्याकाळी तर रक्त, लघवी तपासायला लॅब नव्हत्या. त्याने लघवीला मुंग्या लागलेल्या पाहिल्या आणि एवढय़ा निरीक्षणावरून आजार शोधला. त्याला ‘मधुमेह’ हे आजही टिकून राहिलेले नाव दिले. वा! प्रत्येक भारतीयाला छान अभिमान वाटावा याबद्दल.

हा आजार कसा होतो? लँगरहॅन बेटांवर संप झाला की काय? तसेच काहीसे. इन्शुलिनचे उत्पादन नीट होत नाही, कमी होते, हे खरे. मग काय घोटाळाच हो. पेशींना इंधन? मग काम कशा करणार त्या? काव-काव सुरू.

थांबा. त्याआधी काही गैरसमज आहेत, त्याकडे पाहूयात? हा श्रीमंतांचा, सुखवस्तूंचा आजार. नाही गुरू. आता याचे दर्शन सर्वत्र. स्थूल माणसांना हा होतो. आता भारतात बघाल तर डायबेटिकमध्ये कमी जाड, सडपातळ माणसं जास्त आहेत. आणि हा आजार संपन्न देशांमध्ये मुबलक. आपल्यासारख्या गरीब देशात त्यामानाने नगण्य. तसेही नाही. आपल्याकडे तो झपाटय़ाने वाढतोय. येत्या काही वर्षांत- तज्ज्ञ म्हणतात, आपला देश म्हणजे जगाची डायबेटिसची राजधानी होणार.. वल्र्ड कॅपिटल ऑफ डायबेटिस. यात भूषण मानू नका. आपण एड्समध्येही अशाच पदावर आहोत. सरकारने, हॉस्पिटल्सनी, डॉक्टरांनी यात कसून काम केलं पाहिजे.. उपचार आणि जागृती या दोन्ही बाबतीत.

परत डायबेटिस या आजाराकडे येऊ. हा फसवा आजार आहे. वाटतो सौम्य, पण होऊ शकतो गंभीर. गाफील राहिलात, गोळ्या, पथ्ये चुकवलीत, की गेलाच गाळात समजा.

आधी म्हटल्याप्रमाणे त्या बेटांवरच्या बीटा पेशींनी इन्शुलिननिर्मिती कमी केली, थांबवली तर? दुसरं- शरीरातल्या पेशींवरचे रिसेप्टर्स कमी झाले, अपुरे पडू लागले तर? किंवा इन्शुलिन रिसेप्टर्सवर येऊन बसलेय, पण आतली ‘ग्लूट’ नळकांडय़ांना उत्तेजित करणारी यंत्रणा बिघडली असेल तर..? कारणे अनेक. कारणांत जाण्यात अर्थ नाही. या सगळ्याला उपचार आहेत. आणि डायबेटिस माणसे औषधे घेऊन, पथ्ये पाळून अगदी इतरांसारखे आणि इतरांइतके जगू शकतात. खूप अज्ञात संशोधकांनी केलेल्या अविश्रांत कामामुळे प्रत्येक कारणासाठी औषधे हाताशी आहेत. या औषधांनी सर्व शरीराची इन्शुलिनविषयक संवेदना वाढवली जाते. बीटा सेलमध्ये इन्शुलिन उत्पादनाला चालना मिळते, पेशींवरचे रिसेप्टर्स वाढवले जातात, वगैरे वगैरे. किती नेमकी औषधे, नेमक्या कारणांसाठी! आम्ही अनेक गुरूमहाराजांची पूजा करतो, त्यांचे प्रतिमापूजन करतो; आणि जीवन सुकर करणाऱ्या या संशोधकांना मात्र विसरतो. त्यांचे फोटो लावा, त्यांची पूजा करा- असे नाही म्हणत मी. पण त्यांची आठवण ठेवू या, तरी खूप.

पण औषधे नियमित घेण्याचे विसरलो तर? पथ्यपाण्याला बोअर झालो तर? व्यायामाचा कंटाळा केला तर? मग आपल्या वागण्याचे परिणाम आपणच भोगायचे. डायबेटिसचा दुष्परिणाम प्रत्येक अवयवांवर होतो. काहींवर आधी, काहींवर नंतर. पृष्ठभागाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यांवर परिणाम झाला की सगळेच धोक्यात. डोळ्याचा पडदा, रेटिना बळी पडणार. किडनीतील सूक्ष्म वाहिन्यांच्या अभिसरणावर परिणाम झाला की किडनी निकामी होऊ लागते. हातापायांच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या की गँग्रीनची शक्यता.

शरीर एवढे स्मार्ट, की काही अवयवांची या इन्शुलिनपासून मुक्तता केली आहे. एक म्हणजे मेंदू. मेंदूला साखर खूप लागते. त्याला या चक्रातून उशीर झालेला चालणार नाही. दुसरा अवयव- हृदय. त्या पठ्ठय़ाला इन्शुलिनची गरजच नाही. ते काम हृदयात फॅटी अ‍ॅसिडकडून होतं. बाकी शरीर असेना का इन्शुलिनवर अवलंबून.

आता जगात किती डायबेटिक! त्यातल्या काहींना रोज, किंवा रोज दोनदा इन्शुलिन घ्यावं लागतं. ते आणतात कुठून? लॅबमध्ये तयार होतं का? मामा, तिथंही शास्त्रज्ञांची कमाल ऐका. माणसातून डी. एन. ए.वरचा इन्शुलिन निर्माण करणारा जीन शोधून काढला. तो वेगळा काढला. (हे कसे करतात, ते विचारू नका.) तो जीन त्यांनी बुरशीमध्ये इंजेक्ट केला. म्हणजे त्यांच्या डी. एन. ए.मध्ये बसवलाच. आता त्या बुरशीपासून झालेल्या संततीला तो जीन नैसर्गिकच. त्या बुरशीचे कामच इन्शुलिन स्रवणे. आहे की नाही कमाल!

त्या संशोधकांनी हा जीन ई-कोलाय नावाच्या आपला शत्रू असलेल्या बॅक्टेरियामध्ये बसवलाय. आता हा ई-कोलाय आपल्याला इन्शुलिन देतोय. वा! वा! वाल्याचा वाल्मीकीच की!!

डायबेटिसचा एक प्रकार सांगायचा राहिला. की सांगायचं मी टाळत होतो? काही मुलांना जन्मत:च इन्शुलिनचा अभाव असतो. इन्शुलिन तयार होण्याचे जीन्सच त्यांच्यात नसतात. मग हो? जन्मभर इन्शुलिन टोचून घ्यायचं. रोज. हो कधी दोनदाही. पण ती पोरं शाळेत जाणार. इतर मुलं चॉकलेट, आइस्क्रीम खातात; मग त्यांना खावंसं वाटणार नाही? इतक्या लहान वयात त्यांना कसं कळणार- पथ्यपाणी, जन्मजात आजार वगैरे? त्यांच्या घरचे त्यांनी केलेल्या हट्टापासून कसं परावृत्त करीत असतील?

ऐंशीच्या सुमारास एका दिवाळी अंकात लेख वाचला- ‘गोड मुलांची गोष्ट’!  आनंद नाडकर्णी हा मित्र नुकताच एम. बी. बी. एस. होऊन हाऊसमनची पोस्ट करीत होता. ज्याने जन्मजात मधुमेही (जुवेनाइल डायबेटिक) मुलांमध्ये काम केले होते. त्यांच्या शिबिरावरचा त्यानेच लिहिलेला हा लेख होता. त्याने मुलांची नाटकं बसवली होती. एक पात्र इंजेक्शन, एक सुई. (एरवी या दोघांचा मुलं राग राग करतात.) डाएटमध्येही आपल्यासाठी चांगले खाणे. त्याला हिरवा, मधल्याला पिवळा, जे टाळायचे त्याला लाल रंग. मग त्यांच्यात नाटय़.. त्यातून अप्रत्यक्ष संदेश.

वाचताना गहिवरलो. वाटलं, निसर्गानं आपल्याला एवढं दिलंय, तरी आपण तक्रार करतो, रडगाणं गातो. आणि ही मुलं? आनंदने त्यांच्यात तेरा वर्षे काम केलं. आता त्याचा मित्र बघतो. ती मुलं आता मोठी झालीत. शिकलीत. चांगल्या नोकऱ्याही करू लागलीत. या ग्रुपमध्ये अनेक लग्नं झाली. माझ्या ओळखीचा अ‍ॅलेक्स (फर्नाडिस) आता ‘हिंदुस्थान टाइम्स’मध्ये पत्रकार आहे. यांचे यश पाहून इतर प्रांतांतही असे ग्रुप निघालेत. ज्योत से ज्योत लगाते चलो.

आपण काय शिकणार या मुलांकडून? त्यांच्याजवळ इन्शुलिन नाहीच. आपल्याकडे आहे. आपण आइस्क्रीम खातो. चॉकलेट खातो. आमरस ओरपतो. या सगळ्याची मजा अनुभवतो. पण शरीराची आठवण ठेवून? की कसेही, मन मानेल तसे? शरीराला हवे ते अन्नघटक द्यायचे, की तलफ येईल ते खायचे- आणि तेही अर्निबध? दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू हे तर शरीराचे शत्रूच. हे तर नकोतच. पण अन्नाचाही विचार करूयात का? आपल्या जिभेला हवं असतं, पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं ते खायचं, की शरीराला गरज असेल ते?

शरीरातल्या सूक्ष्म यंत्रणा पाहून मन चकित होतं. एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किती यंत्रणा! सगळ्यांचं एक सूत्र- कुठेही अतिरेक नको. तिखट, तेलकट, तुपकट, मसालेदार हे शरीराला हवं असतं, की याचा शरीराला पचवायला त्रास होतो, हे आपलं आपणच शोधून काढूयात. पचनाचं अद्भुत चक्र पाहता जेवणाच्या वेळा नक्की केल्या तर शरीरातले ‘घडय़ाळ’ लावले जाईल. त्यानुसार पाचकरसांची निर्मिती होईल. पूर्वीचे आपण आदिवासी. जंगलात सतत फिरून अन्न गोळा करणारे. आता आपण बैठे झालो. व्यायाम, योगासनं तर करूच; पण जंगलात, डोंगरावर वरचेवर जाऊ. निसर्गाचा महाविलक्षण अनुभव घेऊ या. आणि त्या गुंतागुंतीचा भाग बनूयात.

मग तुम्हाला ‘इन्शुलिन’ हा शब्दही आठवणार नाही, इतके ते बेमालूम काम करेल.
अनिल अवचट